Agriculture Minister | माणिकराव कोकाटे यांच्या ऑनलाईन रमी गेम प्रकरणानंतर कृषीखात राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाल आहे. कोकाटे यांच्याकडून कृषीखाते काढून घेतल्यावर ते दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आलं. पण आता या संपूर्ण घडामोडींमध्ये छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट करत सांगितलं आहे की, कृषी मंत्रिपदाची पहिली ऑफर त्यांनाच देण्यात आली होती. (Agriculture Minister Offer)
भुजबळ नाशिकमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की, “उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कृषी मंत्रिपदाची पहिली ऑफर मला दिली होती. पण माझं मत होतं की, ग्रामीण भागातील व्यक्ती कृषी खात्याला जास्त न्याय देऊ शकेल. म्हणून मी नकार दिला.” त्यामुळे आता हा गौप्यस्फोट झाल्यानंतर अनेक चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत.
“खाते लहान-मोठं नसतं, काम महत्वाचं” – भुजबळांचं स्पष्ट मत :
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी यावेळी खात्याच्या दर्जावरून होणाऱ्या चर्चा फोल असल्याचंही सांगितलं. “कोणतंही खाते लहान किंवा मोठं नसतं. आपण त्या खात्यात काय काम करतो, यावरच सगळं अवलंबून असतं,” असं त्यांनी स्पष्ट केलं. सध्या ते अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत, आणि या खात्यातून देखील ते जनतेसाठी महत्त्वाचं योगदान देत आहेत.
कृषी खात्याची ऑफर न स्वीकारल्यामागे भुजबळ यांनी दाखवलेली भूमिका अनेकांना सकारात्मक वाटत आहे. कारण, ते ग्रामीण भागातील समस्यांना समजून घेणाऱ्या व्यक्तीकडे ही जबाबदारी जावी, असं म्हणत त्यांनी स्वतःहून पद नाकारलं, हे राजकारणात दुर्मीळ आहे.
Agriculture Minister | मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावरही भुजबळांचं परखड मत :
या संवादादरम्यान छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर न्यायालयाने दिलेल्या निकालावरही प्रतिक्रिया दिली. “अभ्यास करून न्यायव्यवस्थेत काही बदल करणे गरजेचं आहे,” असं त्यांनी म्हटलं. तसेच “तुरुंगात गेलेली वर्षं कोण भरून देणार?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी आपली वेदना मांडली.
छगन भुजबळ यांनी स्वतः तुरुंगवास भोगलेला असल्यामुळे त्यांनी या संदर्भात स्पष्ट भूमिका घेतली. न्यायव्यवस्था ही वेळेवर आणि बिनचूक निर्णय घेणारी असावी, असा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी दिला.






