राजकारणात खळबळ! शिवसेना शिंदे गट आणि भाजप आमने-सामने

On: January 11, 2026 7:06 PM
Dombivli Election Clash
---Advertisement---

Dombivli Election Clash | राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली असताना राजकीय वातावरण अधिकच तापत चाललं आहे. प्रचाराच्या धामधुमीत आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून, अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये थेट संघर्ष पाहायला मिळत आहे. अशातच डोंबिवलीतून एक धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 29 मध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात जोरदार राडा झाला असून, भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मतदारांना थेट पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. या घटनेमुळे महायुतीतील अंतर्गत तणाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

पैसे वाटपाचा आरोप, कार्यकर्ते रंगेहाथ पकडल्याचा दावा :

डोंबिवलीच्या तुकाराम नगर परिसरातील दशरथ भुवन इमारतीत हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे. शिवसेना शिंदे गटाचा दावा आहे की भाजपचे कार्यकर्ते प्रत्येक घरातील एका मतदाराला तीन हजार रुपयांची पाकिटं वाटत होते. ही बाब लक्षात येताच शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी भाजपचे तीन पुरुष आणि एक महिला कार्यकर्ती यांना रंगेहाथ पकडल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांच्याकडून जवळपास सत्तर ते ऐंशी हजार रुपयांची रोख रक्कम तसेच अनेक पाकिटं सापडल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.

Dombivli Election Clash | पोलीस-निवडणूक आयोग दाखल, वातावरण तणावपूर्ण :

ज्या ठिकाणी पैशांची पाकिटं आढळून आली, त्या परिसरात शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार गोंधळ घातला. संशयित कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन ठेवण्यात आलं होतं. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची माहिती मिळताच निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परत घटनास्थळी पोहोचताच पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या प्रकरणामुळे डोंबिवलीत राजकीय वातावरण अधिकच चिघळल्याचं चित्र आहे.

यापूर्वीही नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या काळात अशाच स्वरूपाचे आरोप समोर आले होते. त्यावेळीही पैशांच्या वाटपावरून मोठा वाद झाला होता. त्यामुळे या प्रकरणाकडे निवडणूक आयोग गांभीर्याने पाहत असून, चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

News Title: Cash Distribution Allegations Spark Clash Between BJP and Shinde Sena in Dombivli Ahead of BMC Elections

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now