Air India Bomb Threat | अहमदाबादच्या भीषण विमान दुर्घटनेच्या दुसऱ्याच दिवशी एअर इंडियाच्या आणखी एका फ्लाइटमध्ये मोठा हादरून टाकणारा प्रसंग घडला. थायलंडच्या फुकेतहून दिल्लीला जाणाऱ्या AI 379 या एअर इंडिया विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली, त्यामुळे तातडीने आपत्कालीन लँडिंग करावं लागलं. या प्रसंगामुळे १५६ प्रवाशांमध्ये घबराटचं वातावरण निर्माण झालं.
धमकीचा फोन आणि तात्काळ लँडिंगचा निर्णय :
शुक्रवारी सकाळी 9:30 वाजता फुकेतहून दिल्लीकडे रवाना झालेलं AI 379 विमान अंदमान समुद्राच्या हवाई हद्दीत असतानाच कंट्रोल रूमला बॉम्ब धमकीचा कॉल प्राप्त झाला. यानंतर विमानाने समुद्रावर काही वेळेपर्यंत चक्कर मारली आणि तात्काळ फुकेत विमानतळावर परत लँडिंग करण्यात आलं. सुदैवाने, सर्व प्रवासी सुरक्षित असून विमानात सखोल तपासणी सुरू आहे. (Air India Bomb Threat)
बॉम्ब अलर्ट मिळताच फ्लाइट क्रूने तात्काळ SOP (Standard Operating Procedure) लागू करत प्रत्येक प्रवाशाला सुरक्षितरित्या खाली उतरवलं. विमानतळ प्रशासन, बॉम्ब स्क्वॉड आणि सुरक्षा यंत्रणांनी विमानाची बारकाईने तपासणी सुरू केली आहे. अद्याप धमकी देणाऱ्याचं नेमकं स्रोत किंवा हेतू स्पष्ट झालेला नाही.
Air India Bomb Threat | इराण-इस्त्रायल संघर्षाचा प्रभावही जाणवतोय :
या घटनेच्या पार्श्वभूमीवर अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे इराण आणि इस्त्रायल यांच्यात सुरू असलेला तणाव, ज्यामुळे दोन्ही देशांनी हवाई क्षेत्र बंद केल्याने आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्कळीत झाली आहे. भारतातून निघालेल्या काही विमानांना मार्ग बदलावे लागले, तर काहींना परत यावे लागले.
एअर इंडियाने अधिकृत निवेदनामध्ये प्रवाशांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे. “प्रत्येक प्रवाशाचं आणि कर्मचाऱ्याचं रक्षण हे आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे,” असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. (Air India Bomb Threat)
एअर इंडियाच्या AI-171 विमानाच्या भीषण दुर्घटनेनंतर देश अजूनही शोकसागरात आहे. अशा स्थितीत पुन्हा एकदा दुसऱ्या विमानात असा प्रसंग घडल्याने प्रवाशांचा मानसिक धक्का अधिकच वाढला आहे.






