BJP Biggest Victory | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होताच भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक यश मिळवल्याचे चित्र समोर आले आहे. ‘मिनी विधानसभा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. निकालानंतर भाजपमध्ये जल्लोषाचे वातावरण असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विजयावर पहिली प्रतिक्रिया देत थेट आकडेवारी मांडली आहे. हा विजय केवळ पक्षाचा नसून ‘टीम भाजप’चा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या निवडणुकांमध्ये भाजपने 2017 च्या तुलनेत अधिक मोठी मजल मारली असून, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील हा सर्वांत मोठा विजय असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. महायुतीने राज्यभरात प्रचंड वर्चस्व निर्माण केल्याचे आकडेच सांगत असल्याचे त्यांनी नमूद केले.
भाजपने मोडला 2017 चा विक्रम :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात भाजपाचे तब्बल 129 नगराध्यक्ष निवडून आले आहेत. याशिवाय 3 हजारांहून अधिक नगरसेवक भाजपचे विजयी झाले आहेत. 2017 च्या निवडणुकीत भाजपाचे 1602 नगरसेवक होते, मात्र यावेळी ही संख्या थेट 3302 वर पोहोचली आहे. हा नवा विक्रम असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
महायुतीच्या एकूण नगराध्यक्षांची संख्या 75 टक्क्यांपर्यंत पोहोचली असून, यामध्ये भाजपचा वाटा सर्वाधिक आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेने 54 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 40 नगराध्यक्षपदांवर विजय मिळवला आहे. या एकत्रित यशामुळे महायुतीने जवळपास सव्वा दोनशे नगराध्यक्षपदांवर वर्चस्व मिळवले आहे.
BJP Biggest Victory | विकासाच्या मुद्द्यावर मिळालेला कौल – फडणवीस:
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले की, गेल्या 20 ते 25 वर्षांच्या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात इतका मोठा विजय कोणालाही मिळालेला नाही. या निवडणुकीत त्यांनी एकाही सभेत विरोधकांवर वैयक्तिक टीका केली नाही. प्रचारादरम्यान केवळ विकासाचा रोडमॅप जनतेसमोर मांडण्यात आला आणि त्यालाच जनतेने स्पष्ट कौल दिला, असे त्यांनी नमूद केले.
ही पहिलीच निवडणूक असल्याचा दावा फडणवीस यांनी केला की, ज्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी कोणावरही टीका न करता एवढे मोठे यश मिळवले. लोकांनी दाखवलेल्या विश्वासाला सरकार निश्चितच सार्थ ठरवेल आणि राज्याच्या विकासाला गती देईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनीही या विजयावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, लाखो बूथ कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे हा विजय शक्य झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी स्पष्ट रोडमॅप तयार केला असून, त्याच दिशेने सरकारची वाटचाल सुरू राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.






