Navneet Rana | अमरावती शहरात राजकीय वातावरण तापवणारी गंभीर घटना समोर आली आहे. माजी खासदार नवनीत राणा यांना थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी अमरावती पोलिसांच्या (Amravati police) कंट्रोल रूमवर फोन करून देण्यात आल्याची माहिती समोर आली असून या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तात्काळ दखल घेत तपास सुरू केला आहे. (Navneet Rana threat)
राजापेठ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी एका अज्ञात व्यक्तीने कंट्रोल रूमवर फोन करून नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी दिली. हा कॉल गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलिसांनी कोणताही विलंब न करता आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल :
या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात (Rajapeth Police Station) अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमकी देणारी व्यक्ती कोण होती, तिने फोन कुठून केला आणि धमकी देण्यामागील नेमका उद्देश काय होता, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. पोलिस कंट्रोल रूमवर थेट आलेली धमकी असल्याने हा प्रकार अत्यंत संवेदनशील मानला जात आहे.
पोलिसांकडून कॉल डिटेल्स आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपीचा शोध घेतला जात असून संबंधित व्यक्तीला लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Navneet Rana | सुरक्षा वाढवली, पोलिस अलर्ट मोडवर :
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ हालचाली केल्या असून नवनीत राणा यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन आवश्यक खबरदारीचे उपाय राबवण्यात आले आहेत. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. (Navneet Rana threat)
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. मात्र, धमकी देणाऱ्याचा शोध लागल्यानंतरच संपूर्ण कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सध्या या प्रकरणाचा तपास गांभीर्याने सुरू असून राजकीय वातावरणात तणाव निर्माण झाला आहे.






