Jay Dudhane Arrest | ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या सिझनचा उपविजेता जय दुधाणे याच्याबाबत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाणे पोलिसांनी जय दुधाणेला अटक केल्याची माहिती समोर आली असून, ही कारवाई मुंबई विमानतळावर करण्यात आल्याचं समजतंय. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच जय लग्नबंधनात अडकला होता आणि लग्नाच्या अवघ्या ११ दिवसांत त्याच्यावर ही कारवाई झाल्याने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. (Jay Dudhane Arrest)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जय दुधाणेवर सुमारे पाच कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे काही दुकानं बेकायदेशीरपणे विकल्याचा गंभीर आरोप जयवर करण्यात आला आहे. या व्यवहारांमुळे अनेक खरेदीदारांचं आर्थिक नुकसान झाल्याचं सांगितलं जात असून, या प्रकरणाचा सध्या सखोल तपास सुरू आहे.
पाच कोटींच्या फसवणूक प्रकरणाचा आरोप :
जय दुधाणे हा ठाण्याचा रहिवासी असून तो फिटनेस ट्रेनर, खेळाडू, मॉडेल आणि अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याचा जिम व्यवसाय असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांच्या तपासात जयने बनावट कागदपत्रे तयार करून काही दुकानं वेगवेगळ्या व्यक्तींना विकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या व्यवहारांमुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचं सांगितलं जात आहे.
या प्रकरणात जयच्या कुटुंबीयांचीही चौकशी सुरू असून, आणखी कोण कोण या फसवणूक प्रकरणात सहभागी आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत. सध्या जय दुधाणेला पोलिस कोठडीत ठेवण्यात आलं असून, पुढील तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Jay Dudhane Arrest | लग्नानंतर अवघ्या काही दिवसांत अटक :
२४ डिसेंबर २०२५ रोजी जय दुधाणेने त्याची गर्लफ्रेंड आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षला पाटील हिच्याशी लग्न केलं होतं. ठाण्यात कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला होता. जय आणि हर्षला गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. लग्नानंतर दोघांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. (Jay Dudhane Arrest)
जय दुधाणे सर्वप्रथम ‘स्प्लिट्सविला 13’ या रिअॅलिटी शोमधून प्रसिद्धीझोतात आला होता. या शोचं विजेतेपद त्याने पटकावलं होतं. त्यानंतर ‘बिग बॉस मराठी 3’ मध्ये सहभाग घेत त्याने उपविजेतेपद मिळवलं. याशिवाय जयने काही मराठी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या असून २०२३ मध्ये ‘गडद अंधार’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटांत तो झळकला होता.
लग्नाच्या अवघ्या ११ दिवसांत जय दुधाणेला अटक झाल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड धक्का बसला आहे. या फसवणूक प्रकरणात जयवर नेमके कोणते आरोप सिद्ध होतात, याबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास ठाणे पोलीस करत असून, येत्या काळात अधिक खुलासे होण्याची शक्यता आहे.






