Bhimashankar Temple | श्री क्षेत्र भीमाशंकर (Bhimashankar) मंदिर पुन्हा भाविकांसाठी खुले झाल्यानंतर दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन आणि पोलिसांनी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. पुढील सात दिवसांसाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या आणि दर्शन पास मिळालेल्या भाविकांनाच मंदिरात प्रवेश दिला जाणार असून, विनापास भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश मिळणार नाही.
पहिल्या सात दिवसांचे सर्व स्लॉट फुल :
भीमाशंकर मंदिरात दर्शनासाठी दररोज केवळ एक हजार भाविकांना परवानगी दिली जात आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी करून दर्शन पास घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ऑनलाइन बुकिंग नसलेल्या भाविकांना मंदिर परिसरात येऊ नये.
मंदिर प्रशासनाने उपलब्ध करून दिलेले पहिल्या सात दिवसांचे सर्व ऑनलाइन बुकिंग स्लॉट पूर्णपणे भरले आहेत. त्यामुळे सध्या नवीन नोंदणी प्रक्रिया तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. पुढील सात दिवसांनंतर दर्शन व्यवस्थेबाबत आणि नव्या स्लॉटच्या उपलब्धतेसंदर्भात लवकरच निर्णय जाहीर केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. अधिकृत सूचना मिळाल्यानंतरच भाविकांनी नोंदणी करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Bhimashankar Temple | 30 जूनपर्यंत सकाळी 7 ते 11 वाजता दर्शन :
30 जूनपर्यंत दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत ऑनलाइन नोंदणी केलेल्या भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दर्शनासाठी येताना प्रत्येक भाविकाने वैध ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य राहणार आहे. मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
दरम्यान, आगामी नाशिक (Nashik)-त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमाशंकर येथे भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन विविध सुविधा उभारण्याची कामे सुरू आहेत. नवीन सभामंडप आणि पायाभूत सुविधांच्या कामांसाठी 9 जानेवारी 2026 पासून मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. हा कालावधी 31 मे 2026 पर्यंत वाढवण्यात आला होता. सामान्य परिस्थितीत सुमारे एक वर्ष लागणारे मुख्य सभामंडपाचे काम स्थानिक ग्रामस्थ, भाविक आणि देवस्थान ट्रस्टच्या सहकार्यामुळे अवघ्या पाच महिन्यांत पूर्ण करण्यात आले आहे. दर्शनबारी, परिसर स्वच्छता आणि गर्दी व्यवस्थापनाशी संबंधित कामे अंतिम टप्प्यात असून मंदिर आता भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे.






