BEST Election Result | मुंबईकरांनी बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढी निवडणुकीत भाजपच्या पॅनेलला मोठा पाठिंबा दिला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेच्या संयुक्त ‘उत्कर्ष पॅनेल’ला एकही जागा मिळू शकली नाही, तर भाजपच्या ‘सहकार समृद्धी पॅनेल’ने ७ जागा जिंकत दमदार मुसंडी मारली. या निकालाने ठाकरे गट आणि मनसेला मोठा धक्का बसला आहे. (BEST Election Result)
आशिष शेलार यांची प्रतिक्रिया :
या निकालावर भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. “मुंबईकरांचा हा विजय भाजपसाठी शुभसंकेत आहे. कामगारांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि ‘पत’ व ‘पेढी’साठी लढणाऱ्यांच्या हातात मोठा भोपळा दिला. मुंबईकर, कामगार, श्रमिक आमच्यासोबत आहेत, हे स्पष्ट झाले,” असे ते म्हणाले. शेलार यांनी शिवसेना (उबाठा) आणि मनसेवर अप्रत्यक्ष टीका करत, “मुंबईकर ही आमचा आणि मुंबई ही आमची” असे जाहीरपणे सांगितले. (BEST Election Result)
भाजप प्रदेश माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनीही या विजयाला राजकीय संदर्भ देत प्रतिक्रिया दिली. “मुंबईकरांचा आशीर्वाद हा ड्युप्लिकेट ब्रँडला नसून बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या खऱ्या स्टॅण्डला आहे. ठाकरे गटाचा पराभव म्हणजे उबाठाची खरी ओळख उघड झाली आहे. मतदानातून मुंबईकरांनी थेट त्यांचा धुव्वा उडवला आहे,” असे ते म्हणाले.
BEST Election Result | प्रसाद लाड यांचे ट्वीट :
भाजप नेते प्रसाद लाड यांनीही निकालावर भाष्य करत, “बेस्ट निवडणुकीत ठाकरे ब्रँड २१ विरुद्ध शून्य असा पराभूत झाला आहे. ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाहीत,” असे ट्वीट केले.
या निवडणुकीच्या निकालामुळे मुंबईतील राजकीय समीकरणात खळबळ उडाली असून, भाजपचा हा विजय आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.






