Beed Airport | मराठवाड्यातील बीड जिल्ह्यासाठी एक मोठी आनंदवार्ता आहे. रेल्वेचे स्वप्न साकार झाल्यानंतर आता बीडमध्ये विमानसेवाही सुरू होणार आहे. प्रशासनाने यासाठी कामखेडा परिसरात विमानतळ प्रकल्पासाठी जागा निश्चित केली असून, प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी हालचालींना वेग आला आहे. (Beed flight service)
या संदर्भात एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) आणि महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MADC) या संस्थांच्या अधिकाऱ्यांनी कामखेडा परिसराची पाहणी केली. प्राथमिक चर्चेतून असा निष्कर्ष निघाला आहे की, बीडजवळील कामखेडा हा परिसर विमानतळ उभारणीसाठी सर्वात अनुकूल आहे.
कामखेडा परिसर ठरला योग्य; 170 हेक्टर जमीन लागणार :
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कामखेडा (Khamkheda airport site) परिसरात विमानतळासाठी आवश्यक असणारी 200 एकरांपेक्षा अधिक सरकारी जमीन उपलब्ध आहे. जमिनीचा उतार, हवामान, आणि भूगोल विमानतळ उभारणीसाठी पोषक असल्याने हे ठिकाण अंतिम करण्यात येण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 170 हेक्टर जमीन आवश्यक असून, त्यापैकी 80 हेक्टर जमीन राज्य सरकारकडे आधीपासून उपलब्ध आहे. उर्वरित जमीन भूसंपादनाद्वारे मिळवली जाणार आहे.
प्रशासनाने या प्रकल्पासाठी भूसंपादन, डिझाईनिंग आणि बांधकामाची प्रक्रिया लवकर सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. बीड विमानतळ पूर्ण झाल्यानंतर तो महाराष्ट्रातील नव्या विमानतळांपैकी एक महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
Beed Airport | मुंबई, पुण्याशी थेट हवाई संपर्क; रोजगार आणि विकासाला चालना :
जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्वतः कामखेडा परिसराला (Khamkheda airport site) भेट देत विमानतळ प्रकल्पासाठी आवश्यक सुविधा, सुरक्षा निकष आणि पर्यावरणीय बाबींचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की, विमानतळ सुरू झाल्यानंतर बीडचा संपर्क मुंबई, पुणे आणि इतर प्रमुख शहरांशी थेट हवाई मार्गाने होणार आहे.
या प्रकल्पामुळे प्रवाशांचा प्रवास वेळ कमी होईलच, पण पर्यटन, उद्योग आणि व्यापार क्षेत्रालाही मोठी चालना मिळेल. स्थानिक व्यापारी, उद्योगपती आणि नागरिकांनी या प्रकल्पाचे स्वागत केले असून, बीडच्या विकासासाठी ही मोठी पायरी ठरेल असे मत व्यक्त केले आहे.
रेल्वेनंतर आता विमानसेवा — बीडच्या विकासाचं नवं पर्व :
काही महिन्यांपूर्वीच बीडमध्ये रेल्वे सेवा सुरू झाली होती. तीन पिढ्यांपासून बीडकरांचे “रेल्वे धावावी” हे स्वप्न पूर्ण झाले. (Beed flight service)
आता त्याच पाठोपाठ विमानसेवाही सुरू होणार असल्याने बीडकरांच्या आनंदाला पारावर नाही. एसटी, रेल्वे आणि आता विमान – या तीनही माध्यमांमुळे बीड जिल्हा संपूर्णपणे परिवहनाच्या नकाशावर झळकणार आहे.






