Plane Crash | बांगलादेशची राजधानी ढाका येथून मोठी दुर्घटनेची बातमी समोर येत आहे. सोमवारी दुपारी हवाई दलाचं एक F-7 BGI प्रशिक्षण विमान थेट शाळेच्या इमारतीवर कोसळलं. या भीषण घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
घटना घडली त्यावेळी शाळेत विद्यार्थी उपस्थित असल्याने परिसरात एकच घबराट पसरली होती.
नेमकं काय घडलं? :
दुपारच्या सुमारास, ढाकाच्या उत्तरा भागातील माइलस्टोन स्कूल आणि कॉलेजच्या परिसरात F-7 BGI लढाऊ विमान कोसळलं. बांगलादेश सैन्याच्या जनसंपर्क विभागानेही या घटनेची अधिकृत पुष्टि केली आहे.
विमान कोसळल्याबरोबर परिसरात आगीचा भडका उडाला. स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मृत व्यक्तीचं नाव अद्याप समोर आलेलं नाही.
Plane Crash | या आधीही अशाच दुर्घटना! :
याआधी देखील भारतातील अहमदाबाद येथे एअर इंडियाचं बोइंग 787-8 प्रवासी विमान अपघातग्रस्त झालं होतं. त्यावेळी विमानात 242 प्रवासी होते. केवळ एका प्रवाशाचा जीव वाचला, तर इतरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
या पार्श्वभूमीवर, F-7 BGI सारख्या प्रशिक्षण विमानांचा तांत्रिक बिघाड आणि सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.
दरम्यान, बांगलादेश लष्कर आणि हवाई दलाकडून या अपघाताबाबत उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि तांत्रिक तज्ज्ञ घटनास्थळी पोहोचले आहेत. प्राथमिक माहितीनुसार तांत्रिक बिघाडामुळेच अपघात झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






