Ayush Komkar Murder | पुण्यात ५ सप्टेंबर रोजी झालेल्या आयुष कोमकर हत्याकांडानंतर संपूर्ण शहर हादरलं होतं. अवघ्या १९ वर्षांच्या आयुषला आंदेकर टोळीने १२ गोळ्या झाडून ठार मारलं. या घटनेतून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj andekar) यांच्या हत्येचा बदला घेण्याचा डाव उघडकीस आला. याच प्रकरणात आता आयुषचा लहान भाऊ अर्णव कोमकर (Arnav komkar) पुढे येऊन धक्कादायक खुलासा केला आहे.
हत्येच्या क्षणी काय घडलं? :
अर्णवच्या मते, आयुष त्याला क्लासवरून आणून बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये गाडी लावत होता. तेवढ्यात आंदेकर टोळीतील अमन पठाण आणि यश पाटील धावत आले आणि गोळ्या झाडायला सुरुवात केली. जवळपास १२ गोळ्या झाडण्यात आल्या, त्यापैकी ९ गोळ्या आयुषच्या शरीरात शिरल्या. पहिल्याच गोळीबारात आयुष जमिनीवर कोसळला. (Ayush Komkar Murder)
त्याने सांगितले की, पोलीस जवळपास अर्धा तास उशिरा घटनास्थळी पोहोचले, तर रुग्णवाहिका येण्यासाठी ४०-५० मिनिटांचा विलंब झाला. तोपर्यंत आयुष पार्किंगमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडून होता.
Ayush Komkar Murder | ‘टपका रे टपका’ गाणं कुठून वाजलं? :
हत्येनंतर परिसरात गाजलेलं ‘टपका रे टपका, एक और टपका’ हे गाणं नेमकं कुठून वाजलं, यावर मोठा संभ्रम निर्माण झाला होता. अर्णवने सांगितलं की, “हे गाणं घटनास्थळी नाही वाजलं, तर आंदेकर चौकात स्पीकरवर वाजवलं होतं.”
त्याने पुढे सांगितलं की, हल्लेखोर गोळ्या झाडून निघताना म्हणाले, “इथे फक्त कृष्णा आंदेकर (Krushna andekar) आणि बंडू आंदेकर चालणार. बाकी कोण नाय. आमच्या नादाला लागणार त्याचं असंच होणार.”
कोमकर कुटुंब हादरलं :
हत्येच्या वेळी आयुषची आई कल्याणी कोमकर आणि बहिण अक्षता कोमकर घरी होत्या. त्यांच्या डोळ्यासमोर घरचा मुलगा निर्दयीपणे गमावल्याने कुटुंब शोकाकुल झालं आहे. या हत्येनंतर आंदेकर टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, प्रमुख आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.






