Pune Crime | मावळ (Maval) तालुक्यातील मुंढावरे परिसरात इंद्रायणी ढाब्याजवळ मंगळवारी रात्री कारमध्ये बसलेल्या ६० वर्षीय अशोककुमार सिंग (Ashokkumar singh) यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. पैशांच्या वादातून झालेल्या या हल्ल्यात स्वसंरक्षणासाठी फिर्यादीने केलेल्या गोळीबारात एका हल्लेखोराचा मृत्यू झाला असून कामशेत (Kamshet) पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
हल्ल्याची सविस्तर घटना आणि आरोपींची दहशत :
अशोककुमार सिंग यांच्या कारजवळ आकाश उर्फ बंटी भवरसिंग राजपूत यांच्या नेतृत्वात ८ ते ९ जणांचा गट पोहोचला. या दरम्यान आरोपींनी शिवीगाळ करत ‘तुला आणि तुझ्या मालकाला आज जिवंत सोडणार नाही, आमचे व्यवहाराचे पैसे का देत नाही?’ अशी धमकी दिली. त्यानंतर लोखंडी कोयते आणि लाकडी दांडक्यांनी कारवर जोरदार प्रहार करून वाहनाची तोडफोड करण्यात आली. हल्ल्यात सिंग वार चुकवताना त्यांच्या हाताला दांडक्याचा फटका बसल्याचे पोलिसांनी सांगितले. (Pune Crime News)
या टोळीने अचानक केलेल्या हल्ल्यामुळे परिसरात गोंधळ उडाला. आरोपींनी ४ ते ५ मोटारसायकलींचा वापर करत घटनास्थळावर दबाव निर्माण केला. हल्ल्यामागे आर्थिक व्यवहारातील वाद असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या टोळीतील काही जणांनी पूर्वीही गुन्हे केले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Pune Crime | स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात हल्लेखोराचा मृत्यू :
तोडफोड आणि प्राणघातक वार सुरू असताना परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अशोककुमार सिंग यांनी स्वसंरक्षणार्थ पिस्तूलातून हवेत दोन गोळ्या झाडल्या. मात्र त्यातील एक गोळी आरोपी रोहित मदन कुर्मा (रा. पिंपरी) यांच्या डोक्यात जाऊन लागली. जखम गंभीर असल्याने घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला.
घटनेनंतर उर्वरित आरोपी तात्काळ मोटारसायकलींवरून पळून गेले. मृत आरोपी रोहित कुर्मा याच्याविरुद्ध पिंपरी (Pimpri), निगडी (Nigadi) आणि मंचर (Manchar) या ठिकाणी आधीपासूनच गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कामशेत पोलिसांनी या हल्ल्याचा तपास सुरू केला असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक तैनात करण्यात आले आहे.






