Kiran Damodar Dowry Case | पिंपरी-चिंचवड शहर पुन्हा एकदा हुंडाबळीच्या छायेत ढवळून निघाले आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणाची आठवण ताजी असतानाच किरण दामोदर या २६ वर्षीय विवाहितेने पती आणि सासरच्या अत्याचाराला कंटाळून आपले जीवन संपवले आहे. पाच लाख रुपयांचा हुंडा आणि मोटरसायकलची सततची मागणी, त्यात पतीचा दारूच्या नशेत मारहाण करण्याचा त्रास, यामुळे किरणने गळफास घेऊन जीवन संपवले आहे. (Kiran Damodar Dowry Case)
१७ जुलैच्या मध्यरात्री बोऱ्हाडेवाडीतील राहत्या घरी किरणने टोकाचा निर्णय घेतला. तिच्या या कृत्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विशेषतः किरणच्या दीड वर्षाच्या बाळाचे भवितव्य आता अंधारात गेल्याची भावना तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
पतीची अमानुष मारहाण आणि हुंड्याचा तगादा :
किरणचा पती आशिष दामोदर हा तिला नियमितपणे दारू पिऊन शिवीगाळ आणि मारहाण करत असे. त्याचबरोबर त्याच्या व्यवसायासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणि एक मोटरसायकल आणण्याचा दबावही सतत करत होता. किरणचे वडील संजय दोंड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, किरणच्या आत्महत्येला तिचा पती व सासरचे जबाबदार आहेत.
याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात किरणच्या पती आशिष दामोदर, सासू सुनंदा दामोदर व सासरे दीपक दामोदर यांच्याविरुद्ध हुंडाबळी प्रतिबंधक कायदा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आशिष दामोदरला तात्काळ अटक केली असून, त्याच्या आई-वडिलांचा शोध सुरु आहे. (Kiran Damodar Dowry Case)
Kiran Damodar Dowry Case | “कठोर शिक्षा व्हावी” – कुटुंबीयांची मागणी :
किरणच्या आत्महत्येमुळे तिच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. “माझ्या मुलीच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी,” अशी मागणी तिच्या वडिलांनी केली आहे. दुसरीकडे, शहरात पुन्हा एकदा हुंड्याच्या कारणावरून बळी जाणाऱ्या स्त्रीच्या न्यायासाठी आवाज उठू लागला आहे.






