Air India Flight Return | अहमदाबादमधील विमान अपघाताची धक्कादायक घटना ताजी असतानाच, एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक अडचणीमुळे मोठा प्रसंग उद्भवला. हाँगकाँगहून दिल्लीकडे निघालेलं एअर इंडिया फ्लाइट AI315 टेकऑफनंतर काही वेळातच तांत्रिक बिघाडाच्या संशयावरून हाँगकाँगकडे परतवण्यात आलं. (Air India Flight Return)
पायलटने वेळेत घेतलेला तातडीचा निर्णय आणि वैमानिक यंत्रणांची तत्परता यामुळे मोठा अनर्थ टळला. हे विमान बोईंग 787-8 ड्रीमलायनर असून, त्यामध्ये सुमारे 200 हून अधिक प्रवासी होते. सर्व प्रवासी, पायलट आणि केबिन क्रू सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
पायलटने ओळखला संभाव्य धोका, विमान परतवण्याचा निर्णय :
ही घटना सोमवारी दुपारी 1.15 वाजता घडली. उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात पायलटला यंत्रणेत बिघाडाची जाणीव झाली. संभाव्य धोका लक्षात घेता त्यांनी तात्काळ हाँगकाँग एअर ट्रॅफिक कंट्रोलला संदेश दिला आणि विमान परतवण्याची परवानगी घेतली. काही मिनिटांतच AI315 हाँगकाँग आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितरित्या उतरवण्यात आलं.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्थानिक आपत्कालीन यंत्रणाही सतर्क करण्यात आल्या होत्या. सुदैवाने कोणत्याही प्रकारचं जीवित किंवा वित्तहानीचं वृत्त नाही. मात्र प्रवाशांना काही काळ अडथळ्याला सामोरे जावं लागलं. एअर इंडियाने प्रवाशांना आवश्यक ती मदत आणि पर्यायी सोय उपलब्ध करून दिली आहे.
Air India Flight Return | वारंवार बिघाडामुळे चिंता वाढली :
अहमदाबाद विमान अपघातानंतर अवघ्या काही दिवसांतच एअर इंडियाच्या विमानात ही दुसरी गंभीर तांत्रिक घटना समोर आली आहे. १२ जून रोजी अहमदाबादमध्ये २४२ प्रवाशांसह एअर इंडियाचं विमान कोसळलं होतं, ज्यामध्ये सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे एअर इंडियाच्या तांत्रिक यंत्रणा आणि देखभालीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. (Air India Flight Return)
विमान वाहतूक मंत्रालयाने या घटना गांभीर्याने घेतल्या असून, एअर इंडियाकडून आंतरिक चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येते. तांत्रिक बिघाडांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, एअर इंडियाच्या सुरक्षिततेबाबत सरकारकडून अधिक मजबूत पावलं उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.






