Air India Crash | अहमदाबाद (Ahmedabad) येथे १२ जून रोजी झालेल्या एअर इंडिया (Air India) विमान अपघाताच्या तपासात महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. अपघातस्थळावरून हस्तगत करण्यात आलेल्या विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून (Black Box) डेटा यशस्वीरित्या मिळवण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे. या डेटामुळे अपघाताचे नेमके कारण शोधण्यात मोठी मदत होणार आहे.
तपासातील प्रगती आणि उद्देश
अपघातग्रस्त विमानाच्या (Air India Crash) फ्रंट ब्लॅक बॉक्समधून २४ जून रोजी ‘क्रॅश प्रोटेक्शन मॉड्यूल’ (Crash Protection Module – CPM) सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. यानंतर, २५ जून रोजी मेमरी मॉड्यूल यशस्वीरित्या एक्सेस करून त्यातील संपूर्ण डेटा एएआयबीच्या (AAIB) प्रयोगशाळेत डाउनलोड करण्यात आला. सध्या कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर (FDR) या दोन्हीमधील डेटाचे विश्लेषण सुरू आहे.
नागरी उड्डाण मंत्रालयाने (Ministry of Civil Aviation) दिलेल्या माहितीनुसार, या तपासाचा मुख्य उद्देश अपघातामागील कारणांचा शोध घेणे हा आहे. तसेच, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आणि विमान वाहतूक सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या घटकांची ओळख पटवणे हे देखील महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
काय असतो ‘ब्लॅक बॉक्स’?
‘ब्लॅक बॉक्स’ हे प्रत्येक विमानात (Air India Crash) बसवलेले एक अत्यंत महत्त्वाचे उपकरण असते, जे विमानाच्या उड्डाणादरम्यानच्या सर्व महत्त्वपूर्ण माहितीचा मागोवा ठेवते. व्यावसायिक विमानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ब्लॅक बॉक्समध्ये मुख्यत्वे दोन भाग असतात. यातील पहिला भाग म्हणजे फ्लाईट डेटा रेकॉर्डर (Flight Data Recorder – FDR), जो विमानाचा वेग, उंची, दिशा यासारख्या अनेक तांत्रिक बाबींची नोंद ठेवतो.
दुसरा भाग कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (Cockpit Voice Recorder – CVR) असतो, जो कॉकपिटमधील वैमानिकांचे संभाषण, एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबतचे संवाद आणि इतर सर्व आवाजांची नोंद करतो. हा डेटा मेमरी चिप्समध्ये साठवला जातो. ब्लॅक बॉक्स अत्यंत मजबूत बनवलेला असतो, जेणेकरून तो भीषण अपघात, आग आणि पाण्याच्या दाबालाही सहन करू शकेल आणि त्यातील डेटा सुरक्षित राहील.






