Ahmedabad Plane Crash | अहमदाबादमध्ये घडलेल्या भीषण विमान दुर्घटनेत 240 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला असताना, एका तरुणीचा फक्त 10 मिनिटांचा उशीर तिच्यासाठी फायदेशीर ठरला. अहमदाबादमध्ये राहणारी भूमी चौहान ही लंडनला जाणाऱ्या AI-171 फ्लाईटच्या प्रवाशांपैकी एक असणार होती. मात्र ट्रॅफिक जॅममुळे ती विमानतळावर वेळेवर पोहोचू शकली नाही आणि तिचं बोर्डिंग चुकलं. आणि हेच तिचं भाग्य ठरलं.
ट्रॅफिकमुळे चुकलेलं विमान ठरलं ‘देवाची कृपा’ :
भूमीने मीडियाशी बोलताना सांगितलं की, “माझं विमान 1.10 वाजता होतं, पण मी ट्रॅफिकमुळे 10 मिनिटं उशिरा पोहोचले. बोर्डिंग गेट बंद झालं होतं आणि मला प्रवेश नाकारण्यात आला. मी नाराज होऊन एक्झिट गेटकडे चालत होते, तेवढ्यात मला कळलं की तेच विमान कोसळलं.” त्या क्षणी तिच्या पायाखालची जमीन सरकली. “माझ्या गणपती बाप्पाने मला वाचवलं,” असंही ती भावनिकपणे म्हणाली.
भूमी सध्या लंडनमध्ये आपल्या पतीसोबत राहत असून, सुट्टीसाठी भारतात आली होती. दोन वर्षांनंतर ती पहिल्यांदाच भारतात परतली होती. लंडनला परत जात असताना ही दुर्घटना घडली आणि ती नशिबाने बचावली.
Ahmedabad Plane Crash | विमानाच्या आतूनही एक प्रवासी वाचला! :
इतक्या भीषण अपघातात आश्चर्यकारकरीत्या एका प्रवाशाचा जीव वाचला आहे. रमेश विश्वास कुमार असे त्याचे नाव असून, तो 40 वर्षांचा आहे. रमेश सीट क्रमांक 11A वर बसला होता. अपघातानंतर तो गंभीर जखमी अवस्थेत असून सध्या अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. पोलिस आयुक्त जी. एस. मलिक यांनी ही माहिती दिली आहे.
या दुर्घटनेत अनेक नामवंत प्रवाशांचाही मृत्यू झाला असून, त्यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे ही दुर्घटना केवळ मानवी हानीचीच नाही, तर राज्यासाठीही मोठा धक्का ठरली आहे.






