Ahmedabad Plane Crash | १२ जून २०२५ रोजी अहमदाबादहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या फ्लाईट AI171 या विमानाच्या दुर्घटनेनं देशाला हादरवून सोडलं आहे. टेकऑफनंतर अवघ्या काही क्षणात मेघानी भागातील नागरी वस्तीत हे विमान कोसळले आणि स्फोटासह आगीचे लोळ उठले. या भीषण दुर्घटनेत २५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, अनेक मृतदेह इतके जळाले आहेत की त्यांची ओळख पटवणे अत्यंत कठीण झाले आहे. (Ahmedabad Plane Crash)
या पार्श्वभूमीवर, आजपासून DNA चाचणीद्वारे मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत १९२ नातेवाईकांचे DNA नमुने घेण्यात आले असून, उर्वरितांची तपासणी सुरू आहे. रुग्णालयात एक विशेष हॉल तयार करण्यात आला असून तिथे नातेवाईकांसाठी बसण्याची, वैद्यकीय तपासण्यांची आणि भावनिक आधारासाठी मदत व्यवस्था करण्यात आली आहे.
दुर्घटनेमागे टेकऑफदरम्यान ‘कॉन्फिगरेशन एरर’ कारणीभूत? :
या अपघाताच्या प्राथमिक तपासानुसार, टेकऑफनंतर विमान केवळ ८२५ फूट उंचीवर आणि ३२० किमी/ताशी वेगावर होते, जे अशा परिस्थितीत खूपच कमी आहे. विमानाचे गियर खाली होते, फ्लॅप्स योग्य स्थितीत नव्हते, आणि इंजिन थ्रस्ट अपुरी होती — या सगळ्या बाबींमुळे ‘कॉन्फिगरेशन एरर’मुळेच ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जड वजन, ४३°C तापमान, आणि लिफ्टमध्ये अडथळा हे घटकही कारणीभूत ठरले आहेत. मानवी चूक, फ्लाइट मॅनेजमेंटमधील बिघाड, किंवा पायलट्समधील समन्वयाचा अभाव याकडेही संशयाचा काटा आहे. (Ahmedabad Plane Crash)
दुर्घटनाग्रस्त प्रवाशांच्या कुटुंबीयांसाठी एअरपोर्ट प्राधिकरणाने T2 टर्मिनलवर मदत केंद्र सुरू केले असून, तिथे बसेस, टॅक्सी सेवा, बसण्याची व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष हेल्पलाईन क्रमांकही देण्यात आले आहेत. काल गृहमंत्री अमित शहा यांनी रुग्णालयात भेट दिली होती. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) स्वतः घटनास्थळी आणि रुग्णालयात भेट देणार आहेत. त्यामुळे परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Ahmedabad Plane Crash | विदेशी नागरिकांचाही मृतांमध्ये समावेश :
या दुर्घटनेत ब्रिटन, पोर्तुगाल आणि कॅनडाच्या नागरिकांचाही समावेश असल्याचं समोर आलं आहे. अपघातावेळी विमान एक मेडिकल कॉलेजच्या वसतीगृहावर कोसळलं असल्याने त्याठिकाणी असलेल्या काही विद्यार्थ्यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. त्यामुळे हा अपघात केवळ भारतापुरताच मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय स्तरावरही गंभीर मानला जात आहे.
दरम्यान, या संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या या दुर्घटनेनंतर, सरकार आणि प्रशासन दोघंही याला गंभीरतेने घेत असून मृतदेहांची शास्त्रीय ओळख, अपघाताची चौकशी आणि कुटुंबीयांना आधार यावर भर देण्यात येत आहे. आजच्या DNA तपासण्या आणि पोस्टमार्टम अहवालानंतर अनेक उत्तरं मिळण्याची शक्यता आहे.






