Ahmedabad Plane Crash | अहमदाबादवरून लंडनकडे निघालेल्या एअर इंडियाच्या AI171 या प्रवासी विमानाचा आज दुपारी थरकाप उडवणारा अपघात झाला. टेकऑफनंतर अवघ्या दोनच मिनिटांत विमान कोसळलं आणि परिसरात भीषण स्फोट झाला. या अपघातात १०० हून अधिक लोक मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दुर्घटना एवढी भीषण होती की घटनास्थळाच्या परिसरात धूराचे लोट पसरले होते आणि आगीच्या ज्वाळा काही वेळेपर्यंत शांत झाल्या नाहीत. विमान कोसळल्याची घटना समोर येताच प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणांनी तातडीने धाव घेतली. (Ahmedabad Plane Crash)
विमानात कोण होते प्रवासी? संपूर्ण यादी जाहीर :
AI171 या विमानात एकूण २४२ प्रवासी होते, ज्यामध्ये २ पायलट आणि १० केबिन क्रू यांचाही समावेश होता. एअर इंडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रवाशांमध्ये १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि १ कॅनेडियन नागरिक होते. विशेष म्हणजे ११ लहान मुलं आणि २ नवजात बालकंही यामध्ये होती.
या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी देखील प्रवाशांमध्ये असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. प्रवाशांच्या यादीत त्यांचे नावही दिसून आल्याने चिंता आणखी वाढली आहे. (Ahmedabad Plane Crash)
Ahmedabad Plane Crash | विमानतळ बंद, सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओ :
अपघातानंतर अहमदाबाद विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले असून, सर्व उड्डाणे अन्य विमानतळांवर वळवण्यात आली आहेत. सोशल मीडियावर या अपघाताचे अनेक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घेतली असून, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही तातडीने आपत्कालीन पावले उचलली आहेत. NSG टीमदेखील या बचाव मोहिमेत उतरली आहे.
गुजरात शोकसागरात, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता :
या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गुजरातमध्ये शोककळा पसरली आहे. अनेकांनी आपले जवळचे या अपघातात गमावल्याने दु:ख अनावर झाले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याने अधिकृत यादीवर सर्वांचे लक्ष आहे.
प्रवाशांची संपूर्ण यादी आता समोर आली असून, ती प्रशासनाच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.






