Ahmedabad Plane Crash | अहमदाबादहून लंडनला निघालेलं एअर इंडियाचं विमान भीषण अपघातात कोसळल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर हे विमान आदळल्याने विद्यार्थ्यांचाही बळी गेला. आतापर्यंत २४१ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून घटनास्थळी बचावकार्य वेगात सुरू आहे. या दरम्यान, विमानाच्या अवशेषांतून काही महत्त्वाच्या वस्तू हस्तगत करण्यात आल्या आहेत. (Ahmedabad Plane Crash)
बचाव पथकाने अपघाताच्या ठिकाणी शोध घेत असताना प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू सापडल्या. यात रोख रक्कम, सोन्याचे दागिने, पासपोर्ट, कागदपत्रे आणि मोबाईल फोन्सही होते. विशेष म्हणजे एका प्रवाशाचा फोन स्क्रीन फुटलेला असूनही वाजत होता. या घटनेने मृतांच्या आठवणी जिवंत ठेवल्या आहेत.
ढिगाऱ्यातून सापडलेले सोनं आणि रोख रक्कम :
बचाव कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरून ८० ते ९० तोळे सोनं आणि सुमारे ८० ते ९० हजार रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. तसेच ब्रिटिश नागरिकांचे ८ ते १० पासपोर्ट देखील या ढिगाऱ्यांतून मिळाले आहेत. ही सर्व मौल्यवान वस्तू अधिकृत शासकीय कार्यालयात जमा करण्यात आली आहे. (Ahmedabad Plane Crash)
या अपघातात जळालेल्या मृतदेहांमुळे अनेक प्रवाशांची ओळख पटवणं कठीण झालं आहे. त्यामुळे आता डीएनए चाचणीच्या माध्यमातून मृतांची ओळख पटवण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रिया अत्यंत संवेदनशीलपणे हाताळल्या जात आहेत.
Ahmedabad Plane Crash | “लाइट ऑन झाली आणि…” – एकमेव बचावलेल्या प्रवाशाचा थरारक अनुभव :
या भयानक अपघातातून आश्चर्यकारकरित्या एक प्रवासी वाचला आहे, रमेश विश्वकुमार यांनी सांगितलं की टेकऑफनंतर काही सेकंदांतच विमानात अडखळल्यासारखी हालचाल जाणवली. थोड्याच वेळात हिरव्या आणि पांढऱ्या रंगाची लाइट ऑन झाली आणि विमानाचा वेग अचानक वाढला. काही क्षणातच विमान वसतिगृहावर आदळलं.
या अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, त्यांनी कधीही इतकं भयावह दृश्य पाहिलं नव्हतं. मृतांच्या वस्तू आणि आठवणी गोळा करत असताना अनेक जण भावूक झाले. ही दुर्घटना केवळ एक अपघात न राहता, अनेक कुटुंबांच्या आयुष्यावर गडद सावली टाकून गेली आहे.






