Nitish Kumar l बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या एका कृतीमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त पटण्यातील गांधी घाटावर श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान नितीश कुमार यांनी गांधीजींना श्रद्धांजली अर्पण केली आणि मौन पाळल्यानंतर अनपेक्षितपणे टाळ्या वाजवू लागले. हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाल्याने तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.
विधानसभा अध्यक्षांच्या सतर्कतेमुळे मोठा प्रसंग टळला :
या कार्यक्रमाला बिहार सरकारमधील महत्त्वाचे नेते तसेच विधानसभा अध्यक्ष नंदकिशोर यादव उपस्थित होते. गांधीजींच्या स्मृतीसाठी दोन मिनिटांचे मौन पाळल्यानंतर, नितीश कुमार अचानक टाळ्या वाजवू लागले. हा प्रसंग पाहून विधानसभा अध्यक्ष नंदकिशोर यादव यांनी तातडीने हस्तक्षेप करून त्यांना थांबवले, अन्यथा मोठा गोंधळ उडण्याची शक्यता होती. मात्र, हा क्षण तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आणि तो लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाला.
Nitish Kumar l नितीश कुमार यांच्या मानसिक स्थैर्यावर विरोधकांचा सवाल :
या घटनेनंतर विरोधकांनी नितीश कुमार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. राजदचे नेते सुनील सिंह यांनी टीका करत म्हटले, “आता बिहारचं भविष्य फक्त देवाच्या हाती आहे. जर एका राज्याच्या मुख्यमंत्र्याने अशा प्रकारे वागायला सुरुवात केली, तर त्याबद्दल काय बोलावं?” त्यांनी नितीश कुमार मानसिकरित्या अस्वस्थ असल्याचा आरोप करत त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली.
भाजपच्या दबावामुळे नितीश कुमार भरकटले? :
राजदचे आणखी एक नेते मृत्युंजय तिवारी यांनी देखील यावर टीका करत म्हटले की, “नितीश कुमार भाजपच्या दबावाखाली वागत आहेत. विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांना थांबवलं, पण बिहारच्या जनतेला हे समजून घ्यायचं आहे की, मुख्यमंत्र्यांना नेमकं काय झालं आहे?” नितीश कुमार यांच्यावर याआधीही त्यांच्या आक्रस्ताळ्या निर्णयांमुळे टीका झाली आहे. विधानसभेत अचानक भडकण्याची त्यांची सवय सर्वांना परिचित आहे.
आपलोग त जनबे करते हैं न जी की गार्ड ऑफ ऑनर के वक्त भी ताली बजा दिया जाता है#NitishKumar #BiharCM #Bihar pic.twitter.com/Wh77a7zxft
— Thakur Divya Prakash (@Divyaprakas8) January 30, 2025






