Arunachal Pradesh | भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीमुळे सीमेवर शांतता नांदत असतानाच, चीनने (China) पुन्हा एकदा भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. चीनने नुकताच एक नकाशा जारी केला आहे, ज्यामध्ये त्यांनी अरुणाचल प्रदेशावर (Arunachal Pradesh) आपला हक्क सांगत येथील काही ठिकाणांची नावे बदलली आहेत. चीनच्या या कृतीनंतर भारताने त्वरित आणि कठोर प्रतिक्रिया दिली आहे. भारताने स्पष्टपणे म्हटले आहे की चीनचे हे निरर्थक प्रयत्न सत्य बदलू शकत नाहीत.
अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलण्याचा चीनचा प्रयत्न :
भारताने ठामपणे सांगितले आहे की कोणत्याही परिस्थितीत सत्य बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश हे भारताचे अविभाज्य अंग होते, आहे आणि कायम राहील. चीनकडून वारंवार अरुणाचल प्रदेश हा दक्षिण तिबेटचा (South Tibet) भाग असल्याचा आणि त्यामुळे तो चीनचाच भूभाग असल्याचा दावा केला जातो. मात्र, भारताने वेळोवेळी चीनच्या या दाव्याचे खंडन केले आहे आणि यापुढेही करत राहील.
अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे बदलण्याचा चीनचा प्रयत्न पूर्णपणे निरर्थक आणि हास्यास्पद आहे. भारत आपल्या सैद्धांतिक भूमिकेवर कायम असून, चीनच्या अशा कोणत्याही प्रयत्नांना आम्ही स्पष्टपणे धुडकावून लावतो. केवळ नावांमध्ये बदल करून अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग आहे, हे सत्य कधीही बदलणार नाही. परराष्ट्र मंत्रालयाचे (Ministry of External Affairs) प्रवक्ते रणधीर जायसवाल (Randhir Jaiswal) यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि नेहमी राहील. या संदर्भात भारत भविष्यात आणखी काही पाऊले उचलतो का, हे पाहणे महत्त्वाचे असेल.
Arunachal Pradesh | पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला होता
या पार्श्वभूमीवर, चीनचा पाकिस्तानला (Pakistan) असलेला पाठिंबा देखील उल्लेखनीय आहे. पहलगाममधील (Pahalgam) दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये (Pakistan-occupied Kashmir) दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले होते. यानंतर पाकिस्तानी लष्कराने भारतावर ड्रोन (drones) आणि क्षेपणास्त्रांनी (missiles) हवाई हल्ले केले. भारताने या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानी लष्कराचे हवाई तळ उद्ध्वस्त केले.
या सर्व परिस्थितीत चीन सातत्याने पाकिस्तानच्या बाजूने उभा राहिला होता. चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी जाहीरपणे म्हटले होते की, चीन कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानचे सार्वभौमत्व आणि अखंडता जपण्यासाठी प्रयत्न करेल. एकीकडे चीनने पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला होता, तर दुसरीकडे दहशतवाद्यांवरील कारवाईनंतर भारताच्या विरोधात लढणाऱ्या पाकिस्तानला चीन सातत्याने पाठिंबा देत आहे. चीनचा हा दुटप्पीपणा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरला होता.






