Farmer Loan Waiver | मुंबईत मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनानंतर आता शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. शिवसेना (ठाकरे गट) आमदार कैलास पाटील यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. त्यांनी राज्य सरकारला स्पष्ट इशारा दिला असून, “शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय पुढील दोन महिन्यांत झाला नाही, तर आम्ही थेट मुंबईत मेळावा घेऊन सरकारला जाब विचारू,” असा अल्टिमेटम दिला आहे. (Farmer Loan Waiver)
येत्या 28 ऑक्टोबर रोजी मुंबईत लाखो शेतकऱ्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यातून सरसकट कर्जमाफीची मागणी गगनभेदी घोषणांनी घुमवली जाणार असून, आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यासाठी राज्यभरात विभागवार सभा घेण्यात येणार आहेत.
शेतकरी कर्जमाफीची मागणी तीव्रतेने पुढे :
आमदार कैलास पाटील यांनी सांगितले की, शेतकरी सध्या आर्थिक संकटात आहेत. वाढती उत्पादनखर्च, हवामानातील अनिश्चितता आणि बाजारभावातील घसरण या सर्वामुळे शेतकऱ्यांचे हाल झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी हा एकमेव उपाय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Farmer Loan Waiver)
त्यांनी आणखी सांगितले की, या आंदोलनात विविध शेतकरी संघटना आणि राजकीय पक्ष सहभागी होणार आहेत. आगामी दोन महिन्यांत होणाऱ्या विभागवार मेळाव्यांमधून या आंदोलनाला जनाधार मिळवला जाईल आणि त्यानंतर मुंबईतील मेळाव्यातून सरकारवर दबाव आणला जाईल.
Farmer Loan Waiver | मराठा आरक्षणानंतर सरकारसमोर नवे आव्हान :
दरम्यान, २९ ऑगस्ट रोजी मुंबईत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन होणार आहे. “सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही,” असा ठाम पवित्रा जरांगेंनी घेतला आहे. या आंदोलनामुळे राज्याचे राजकीय वातावरण तापले असतानाच शेतकरी कर्जमाफीसाठी नियोजित भव्य मेळावा हा सरकारसाठी आणखी एक मोठे आव्हान ठरणार आहे.
राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, मराठा आरक्षण आणि शेतकरी कर्जमाफी हे दोन्ही प्रश्न एकाचवेळी डोक्यावर आल्याने सरकारला संतुलन साधणे कठीण जाईल. त्यामुळे पुढील काही महिने महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडण्याची शक्यता आहे.






