Afghanistan Pakistan conflict | पाकिस्तान आणि अफगाणिस्तान (Afghanistan) यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असून, अफगाण सैन्याने केलेल्या एका मोठ्या कारवाईने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आहे. पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानने केलेल्या या भीषण हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.
पाकिस्तानवर अफगाणिस्तानचा हल्ला
शनिवारी रात्री उशिरा अफगाण सैन्याने पाकिस्तानच्या लष्करी चौक्यांना लक्ष्य करत जोरदार आक्रमण केले. रात्रभर चाललेल्या या कारवाईत तब्बल ५८ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाला, तर ३० हून अधिक सैनिक जखमी झाले आहेत. हा हल्ला इतका तीव्र होता की, अफगाणिस्तानने सीमेवरील पाकिस्तानच्या २५ लष्करी चौक्यांवर ताबा मिळवला आहे.
इतकेच नाही, तर सात पाकिस्तानी सैनिकांना ओलिस ठेवण्यात आल्याचेही वृत्त आहे. पाकिस्तानच्या लष्करावर झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. पाकिस्तानने गुरुवारी काबुलवर (Kabul) केलेल्या बॉम्ब हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे तालिबान (Taliban) सरकारचे मुख्य प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद (Zabihullah Mujahid) यांनी सांगितले. या घटनेनंतर पाकिस्तानकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
Afghanistan | संरक्षणमंत्र्यांचे पाकिस्तानवर थेट आरोप
या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री मौलवी मोहम्मद याकूब मुजाहिद (Mullah Mohammad Yaqoob Mujahid) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, अफगाणिस्तानची सुरक्षा व्यवस्था मजबूत असून, पाकिस्तानी लष्करातील एक विशिष्ट गट आमच्या देशात अशांतता पसरवण्याचा आणि खोटा प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहे. सीमेवर हल्ल्यांना प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही कृतीला चोख प्रत्युत्तर देण्यास आम्ही तयार आहोत.
संरक्षणमंत्र्यांनी पुढे पाकिस्तानवर आयसिसच्या (ISIS) उपस्थितीकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोप केला. ते म्हणाले की, पाकिस्तानने आपल्या भूमीवरील आयसिसकडे कानाडोळा केला आहे. अफगाणिस्तानला आपल्या हवाई आणि सीमांचे रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि कोणताही हल्ला अनुत्तरीत राहणार नाही. यावेळी त्यांनी ५८ पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आणि ओलिस ठेवलेल्या सैनिकांचे छायाचित्रही प्रसिद्ध केले.






