Aditya Thackeray | नाशिकमध्ये शिवसेनाचा (ठाकरे गट) ‘निर्धार मेळावा’ नुकताच पार पडला असून, या मेळाव्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या ( Ladki Bahin Yojana ) भवितव्यावर मोठा गौप्यस्फोट करत, ही योजना सरकार लवकरच बंद करण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला आहे.
सरकारवर जोरदार हल्लाबोल
आपल्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी सरकारच्या 100 दिवसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “या सरकारने अजूनतरी एकही ठोस योजना जनतेसाठी आणली नाही,” असा टोला लगावत त्यांनी लाडकी बहीण योजनेतील कपात व लाभार्थ्यांची संख्या कमी करण्यावर चिंता व्यक्त केली.
“ही योजना सुरू करताना सत्ताधाऱ्यांनी अडीच कोटी महिलांना लाभ देण्याचं आश्वासन दिलं होतं, पण आता आठ लाख महिला या योजनेतून वगळण्यात आल्या आहेत. पुढील टप्प्यात 50 लाख महिलांनाही वगळण्याची शक्यता आहे. काहींना मिळालेले पैसे सरकार परत घेत असून, काहींवर पोलीस कारवाईचा धोका आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
…आणि जबाबदारी झटकता येईल
ठाकरेंनी दावा केला की, सत्ताधाऱ्यांचा प्लॅन अगदी स्पष्ट आहे. “योजना बंद करायची, आणि त्यासाठी कोणीतरी त्यांच्या गटातूनच न्यायालयात याचिका दाखल करणार. मग कोर्टाच्या आदेशाने ही योजना गुंडाळली जाईल आणि जबाबदारी झटकता येईल,” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना, त्यांनी पुण्यातील एसटी कर्मचाऱ्याच्या बलात्कार प्रकरणातील गृह राज्यमंत्र्यांच्या विधानावरही संताप व्यक्त केला. बीड व परभणी येथील गंभीर घटनांचा दाखला देत त्यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. “बीडमधील प्रकरणात फोटो बाहेर येईपर्यंत मंत्रीपदाचा राजीनामा घेतला गेला नाही, ही गोष्ट दु:खद आणि लाजीरवाणी आहे,” असेही ते म्हणाले.
“जर भाजपच्याच कार्यकर्त्यांवर हल्ले होत असतील आणि त्यांनाच न्याय मिळत नसेल, तर सामान्य माणसाचे काय?” असा खडा सवाल करत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या अपयशावर बोट ठेवले.






