मोठी बातमी! आदिती तटकरे रायगडमध्ये ध्वजारोहण करणार तर नाशिकचाही तोडगा निघाला

On: August 11, 2025 6:12 PM
aditi tatkare
---Advertisement---

Aditi Tatkare | रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेल्या वादाला अखेर तोडगा निघाला आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर केली असून, रायगडमध्ये अदिती तटकरे, नाशिकमध्ये गिरीश महाजन आणि बीडमध्ये अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडणार आहे. (Aditi Tatkare)

रायगडमध्ये आदिती तटकरे ध्वजारोहण करणार :

यावर्षी 18 जानेवारीला जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवर महायुतीतील मतभेदांमुळे स्थगिती देण्यात आली. रायगडसाठी राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आणि शिवसेनेच्या भरत गोगावले यांच्यात, तर नाशिकसाठी भाजपचे गिरीश महाजन आणि शिवसेनेचे दादा भुसे यांच्यात तणाव होता. हा वाद राज्यापासून दिल्लीपर्यंत गेला होता.

नवीन यादीप्रमाणे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणाचा मान अदिती तटकरे यांना मिळाला आहे. भरत गोगावले यांनाही पालकमंत्रीपदाची अपेक्षा होती, मात्र गेल्या आठवड्यात त्यांनी “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जे ठरवतील ते मान्य” असे वक्तव्य करून सौम्य भूमिका घेतली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर तिढा सुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Aditi Tatkare | नाशिकमध्ये गिरीश महाजन यांचा मान :

नाशिक जिल्ह्यातील ध्वजारोहणाची जबाबदारी भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. शिवसेनेचे दादा भुसे यांच्याशी असलेला वाद लक्षात घेता हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यंदा स्वातंत्र्यदिनानिमित्त बीड येथे ध्वजारोहण करणार आहेत. पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर पहिल्यांदाच ते बीडच्या ध्वजारोहण सोहळ्यात सहभागी होणार आहेत. अलीकडील बीड दौऱ्यात त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत गुन्हेगारांना थेट इशारा दिला होता.

राज्यातील 34 जिल्ह्यांमधील ध्वजारोहण सोहळ्यांसाठी कोणत्या जिल्ह्यात कोण मंत्री उपस्थित राहणार याची संपूर्ण यादी राज्य सरकारने प्रसिद्ध केली आहे. यामध्ये रायगड, नाशिक आणि बीडसारख्या चर्चेत असलेल्या जिल्ह्यांबाबतचा वाद आता निकाली निघाल्याने स्वातंत्र्यदिनाचे कार्यक्रम निर्विघ्न पार पडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

News Title: Aditi Tatkare to Hoist Flag in Raigad, Girish Mahajan in Nashik, Ajit Pawar in Beed on 15 August

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now