Abhijit Dipke | दिल्ली (Delhi) येथील आंदोलन संपल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके (Abhijit Dipke) छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे परतले. विमानतळावर त्यांचे कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी केंद्र सरकारवर टीका करत विद्यार्थ्यांशी अन्याय सुरू राहिल्यास भविष्यात त्याचे गंभीर राजकीय परिणाम होतील, असा इशारा दिला.
संभाजीनगरात जल्लोषात स्वागत :
दिल्लीतील आंदोलन संपल्यानंतर अभिजीत दीपके आपल्या मूळ गावी परतले. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर कार्यकर्त्यांनी पुष्पहार घालून आणि घोषणाबाजी करत त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी गेल्या सुमारे 40 दिवसांच्या संघर्षानंतर घरी परतल्याचा आनंद व्यक्त केला. भारतात परतल्यानंतर आंदोलनात सहभागी झालो आणि मागील 36 दिवस जंतर-मंतर (Jantar Mantar) येथे आंदोलन सुरू होते, असे त्यांनी सांगितले.
आंदोलनाला यश मिळाल्याचा दावा करत त्यांनी हा विजय देशातील विद्यार्थ्यांचा असल्याचे म्हटले. इतक्या दिवसांनी आई-वडिलांना भेटण्याची संधी मिळाल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानत पुढील काळातही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढा सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
Abhijit Dipke | विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर सरकारवर टीका :
अभिजीत दीपके यांनी सरकारवर जोरदार टीका करत 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा उल्लेख केला. सरकारमुळे विद्यार्थ्यांचे रक्त रस्त्यावर सांडल्याचा आरोप त्यांनी केला. विविध राज्यांमध्ये विद्यार्थ्यांना त्रास दिला जात असून त्यांच्या घरी जाऊन पोलिसांकडून दबाव टाकला जात असल्याचा दावाही त्यांनी केला. अटक आणि ताब्यात घेण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे सांगत, विद्यार्थी दहशतवादी नसून देशाचे भविष्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
सरकारने आपल्या भूमिकेत बदल केला नाही आणि विद्यार्थ्यांशी अन्याय सुरूच ठेवला, तर त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला. सध्या केवळ धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र भविष्यातही सरकारने योग्य निर्णय घेतले नाहीत, तर हेच विद्यार्थी सरकार बदलण्याची ताकद दाखवतील, असे विधान त्यांनी केले. दिल्लीतील आंदोलनानंतर आता पुढील काळात त्यांची भूमिका आणि सीजेपीची पुढील रणनीती काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






