Abhijit Dipke | कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन मागे घेण्याची घोषणा केल्यानंतरही त्यावरील राजकीय प्रतिक्रिया कायम आहेत. आंदोलनामुळे देशाची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी केला होता. या आरोपांना उत्तर देताना अभिजीत दीपके (Abhijit Dipke) यांनी आंदोलनाचे समर्थन करत पतंजली (Patanjali) उत्पादनांबाबतही रामदेव यांच्यावर जोरदार टीका केली.
आंदोलनावरून बाबा रामदेवांना प्रत्युत्तर :
अभिजीत दीपके छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) दौऱ्यावर आले असता त्यांनी महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन केले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी बाबा रामदेव यांनी केलेल्या आरोपांना सविस्तर उत्तर दिले. पेपरफुटीच्या विरोधात उभारलेल्या आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) आणि महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या प्रतिमा हातात घेऊन, जय भीमच्या घोषणा देत आंदोलन करण्यात आले. अशा आंदोलनामुळे देशाची किंवा संस्कृतीची बदनामी होते, हा दावा चुकीचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दीपके यांनी पुढे सांगितले की, देशाची खरी बदनामी पेपरफुटीसारख्या घटनांमुळे झाली आहे. त्या विरोधात शांततापूर्ण आंदोलन करणे हे लोकशाहीतील नागरिकांचे अधिकार आहेत. त्यामुळे आंदोलनाला दोष देण्याऐवजी अशा घटनांवर भाष्य करणे अधिक आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. आंदोलनावर टीका करण्याऐवजी त्यामागील कारणांचा विचार करावा, असेही त्यांनी सूचित केले.
Abhijit Dipke | पतंजली उत्पादनांवरूनही साधला निशाणा :
बाबा रामदेव यांच्यावर टीका करताना अभिजीत दीपके यांनी काही महिन्यांपूर्वी पतंजलीच्या काही उत्पादनांबाबत झालेल्या वादाचाही उल्लेख केला. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) पतंजलीच्या काही उत्पादनांबाबत ग्राहकांची दिशाभूल होत असल्याबद्दल निरीक्षणे नोंदवली होती, असा दावा करत त्यांनी रामदेव यांनी संस्कृती किंवा लोकशाहीबाबत भाष्य करण्याऐवजी स्वतःच्या उत्पादनांकडे लक्ष द्यावे, अन्यथा ती बंद पडण्याची वेळ येऊ शकते, असा इशाराही दिला.
यावेळी त्यांनी मध्य प्रदेश (Madhya Pradesh) मधील भोपाळ (Bhopal) येथे झालेल्या शेतकरी आंदोलनाचाही उल्लेख केला. शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांच्यासह अनेक शेतकरी प्रतिनिधींशी झालेल्या भेटीत विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिल्याचे दीपके यांनी सांगितले. शेतकऱ्यांची मुलेही शिक्षण घेत असून त्यांना चांगले करिअर घडवायचे आहे, हीच आंदोलनामागची भावना असल्याचे त्यांनी नमूद केले. आपण मूळचे हिंगोली (Hingoli) येथील असून आपल्या कुटुंबाची पार्श्वभूमी शेतीशी संबंधित आहे. त्यामुळे ज्या वेळी शेतकऱ्यांना आपल्या सहकार्याची गरज भासेल, त्या प्रत्येक वेळी आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.






