महायुतीत खळबळ! अभिजीत दिपकेंनी थेट मागितला ‘या’ मंत्र्याचा राजीनामा

On: August 20, 2026 1:49 PM
Abhijeet Dipke
---Advertisement---

Abhijeet Dipke | अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांनी आता महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांच्या दुरवस्थेचा मुद्दा उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्या, खराब रस्ते, शाळांमध्ये सापांचा वावर आणि मूलभूत सुविधांचा अभाव यावर त्यांनी सरकारला धारेवर धरले. शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी पदावर राहू नये, अशी थेट मागणी करत त्यांनी महायुती सरकारवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

जिल्हा परिषद शाळांच्या परिस्थितीवर संताप :

हिंगोली जिल्ह्यातील एका शाळेला भेट देत त्यांनी मुख्याध्यापकांच्या बदलीची मागणी केली होती. ही बदली झाली नाही तर उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

अलीकडेच त्यांनी मंत्री, आमदार आणि खासदारांनी स्वतःच्या मुलांना किमान एक दिवस खराब रस्त्यावरून पायी शाळेत पाठवावे, असे आवाहन केले. त्यानंतरच विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींची खरी जाणीव लोकप्रतिनिधींना होईल, असे ते म्हणाले. त्यांच्या आंदोलनाची घोषणा होताच प्रशासनातील यंत्रणा कामाला लागली, मात्र काही आदिवासी विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागल्याचा आरोपही त्यांनी केला.

Abhijeet Dipke | शाळांची अवस्था पाहून शिक्षणमंत्र्यांवर निशाणा :

खराब रस्त्यांसोबतच साप चावल्यामुळे विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा मुद्दाही दिपके यांनी मांडला. सरकारच्या अपयशामुळे या घटना घडल्याचा आरोप करत त्यांनी उजनी येथील शाळेचाही उल्लेख केला. या शाळेत परिसरातच नव्हे तर वर्गखोल्यांमध्येही साप आढळत असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर चर्चेसाठी बोलावले तर आपण भेटण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गावकऱ्यांना सोबत घेऊन या प्रश्नासाठी आवाज उठवून तो मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांना भेटण्याची आता आवश्यकता नसल्याचे सांगत दिपके यांनी स्थानिक पातळीवरील शिक्षण व्यवस्थेवरही टीका केली. त्यांच्या मते, गावकऱ्यांनी एकत्र येऊन शाळांच्या समस्यांविरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे. महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून मागील सरकारच्या काळातील परिस्थितीचा दाखला दिला जाऊ शकतो, मात्र सत्तांतरानंतरही शाळांची अवस्था सुधारलेली नाही, असा दावा त्यांनी केला.

News title : Abhijeet Dipke Demands Education Minister Resignation

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now