Vaibhav Sooryavanshi | भारत (India) आणि आयर्लंड (Ireland) यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज खेळवला जाणार असून, युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याच्या पदार्पणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिल्या सामन्यात त्याला संधी न मिळाल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजी व्यक्त झाली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यापूर्वी भारताचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा (Aakash Chopra) यांनी वैभवला अद्याप प्लेइंग-11मध्ये स्थान देऊ नये, असे मत व्यक्त केले आहे.
वैभवला संधी देऊ नये, आकाश चोप्रांचे मत :
आयर्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वीच वैभव सूर्यवंशीच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची चर्चा रंगली होती. पहिल्याच सामन्यात त्याला संधी मिळेल, अशी अपेक्षा अनेकांना होती. मात्र, संघ व्यवस्थापनाने त्याला अंतिम संघात स्थान दिले नाही. आता दुसऱ्या टी-20 सामन्यात तरी त्याचा समावेश होईल का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर अनेकांनी वैभवला संघात घेण्याची मागणी केली असली तरी आकाश चोप्रा यांनी वेगळाच दृष्टिकोन मांडला आहे.
बेलफास्ट (Belfast) येथे 26 जून रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली. भारतीय संघ अवघ्या 148 धावांवर सर्वबाद झाला आणि 34 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. संजू सॅमसन (Sanju Samson), ईशान किशन (Ishan Kishan) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांना मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात वैभवला संधी मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली.
Vaibhav Sooryavanshi | त्याच फलंदाजांवर विश्वास ठेवण्याचा सल्ला :
आकाश चोप्रा यांनी सांगितले की, दुसऱ्या सामन्यात वैभवला खेळवायचे की नाही, हा संघ व्यवस्थापनासमोर सर्वात महत्त्वाचा प्रश्न असेल. मात्र, आपण वैयक्तिकरित्या वैभवला अद्याप अंतिम संघात स्थान देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे मत अनेकांना पटणार नाही, तरीही आपण सध्या विद्यमान फलंदाजांवरच विश्वास ठेवणे योग्य मानत असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यांच्या मते, ईशान किशन किंवा संजू सॅमसन यांना एका खराब सामन्यानंतर बाहेर बसवणे योग्य ठरणार नाही. अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला अपेक्षित कामगिरी करता आली नसली, तरी त्याच तिन्ही फलंदाजांना पुन्हा संधी द्यावी. पुढील सामन्यात प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यास हाच संघ 250 धावांपर्यंत मजल मारू शकतो, अशी क्षमता त्यांच्यात असल्याचा विश्वासही आकाश चोप्रा यांनी व्यक्त केला.






