8th Pay Commission | केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सातव्या वेतन आयोगाचा कालावधी 31 डिसेंबर 2025 रोजी संपत असून, त्याआधीच केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये वेतनवाढीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेषतः नवीन वेतन आयोग कधीपासून लागू होणार आणि पगारात नेमकी किती वाढ होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जानेवारी 2025 मध्ये आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी आयोगाच्या अध्यक्ष, सदस्य आणि सदस्य सचिवांची अधिकृत घोषणा करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजना देसाई या आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षा आहेत. तर आयआयएम बंगळुरुचे प्रा. पलक घोष अर्धवेळ सदस्य असून पंकज जैन हे आयोगाचे सदस्य सचिव आहेत. आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार? :
सध्याची परिस्थिती पाहता आठव्या वेतन आयोगाचा अंतिम अहवाल 1 जानेवारी 2026 पूर्वी सादर होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे 1 जानेवारी 2026 पासून तात्काळ अंमलबजावणी होईल, असे सध्या तरी निश्चितपणे सांगता येत नाही. मात्र, आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर केंद्र सरकार मागील कालावधीपासून म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेऊ शकते. ( Central Government Employees Salary)
जर असा निर्णय घेतला गेला, तर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दरम्यानच्या काळातील थकबाकी रक्कम (Arrears) मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी सातवा वेतन आयोगही 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात आला होता. त्यामुळे यावेळीही आठवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू केला जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
8th Pay Commission | फिटमेंट फॅक्टर किती असणार? :
आठव्या वेतन आयोगातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फिटमेंट फॅक्टर. सध्याच्या चर्चेनुसार फिटमेंट फॅक्टर 2.4 ते 3.0 दरम्यान असण्याची शक्यता आहे. सहाव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 1.86 होता, तर सातव्या वेतन आयोगात तो 2.57 इतका होता. त्यामुळे यावेळी फिटमेंट फॅक्टर वाढल्यास कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होऊ शकते. (8th Pay Commission News)
फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) म्हणजे मूळ वेतनावर लावला जाणारा गुणक. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18,000 रुपये असेल आणि फिटमेंट फॅक्टर 2.4 ठरला, तर नवीन मूळ वेतन 43,200 रुपये होऊ शकते. म्हणजेच थेट 25,000 रुपयांपेक्षा जास्त वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, महागाई, जीवनावश्यक खर्च, महागाई निर्देशांक तसेच सरकारची आर्थिक स्थिती आणि अर्थसंकल्पीय क्षमता या सर्व बाबी लक्षात घेऊन अंतिम फिटमेंट फॅक्टर निश्चित केला जाईल.






