Maharashtra Teachers Strike | राज्यात आज शिक्षकांचा मोठा संप पाहायला मिळत आहे. कारण शिक्षक संघटनांनी महाराष्ट्र राज्य सरकारविरोधात आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवत आज 5 डिसेंबर रोजी शाळा बंदची (School Shutdown) हाक दिली होती. प्रशासनासोबत झालेल्या चर्चेत कोणताही निर्णय न निघाल्याने शिक्षकांनी संपावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे आज राज्यातील तब्बल 80 हजार शासकीय आणि खासगी अनुदानीत शाळांना कुलूप लागले आहे. मात्र शिक्षकांच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर या बंदचा थेट परिणाम होत असून, पालकांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शासनाच्या आदेशानुसार या बंदमध्ये सहभागी झालेल्या शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कपातीचा इशारा देखील दिला गेला होता. मात्र, याचा शिक्षक संघटनांवर कोणताही परिणाम न दिसता त्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलनावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शिक्षण विभाग आणि शिक्षक संघटना यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. विरोधी आणि सत्ताधारी पक्षातील शिक्षक आमदारांनी या आंदोलनाला उघडपणे पाठिंबा देत शिक्षकांच्या मागण्यांना हातभार लावला आहे. (Maharashtra Teachers Strike)
शिक्षकांच्या प्रमुख मागण्या काय आहेत? :
शिक्षकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये 2024 मधील संच मान्यता धोरण रद्द करणे आणि TET परीक्षेमुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करणे यांचा समावेश आहे. तसेच संघटनांचा आरोप असा आहे की, सध्याच्या धोरणामुळे राज्यातील हजारो शाळांमध्ये फक्त एक किंवा दोनच शिक्षक राहतील, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. या प्रश्नावर अद्याप तोडगा निघालेला नसल्याने शिक्षकांनी शाळा बंद ठेवण्याचा निर्धार जाहीर केला आहे.
राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, शिक्षकेत्तर, शिक्षण सेवक, मुख्याध्यापक संघटना आणि संस्थाचालक एकाच झेंड्याखाली या संपात सहभागी झाले आहेत. दोन वर्षांत टीईटी उत्तीर्ण न झाल्यास शिक्षकांवर टांगती तलवार आहे, तर संच मान्यतेचा प्रश्नही अधिक गुंतागुंतीचा बनला आहे. ग्रामीण भागातील अनेक मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने शिक्षण व्यवस्थेतील संकट अधिक गडद झाले आहे.
Maharashtra Teachers Strike | मुंबईत शाळा सुरू, पालकांमध्ये मात्र संभ्रम कायम :
मुंबई, भायखळा आणि आसपासच्या परिसरातील शाळांनी विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आज शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अचानक दिलेल्या बंदच्या हाकेमुळे पालकांना मोठा संभ्रम झाला होता, मात्र अनेक शाळांमध्ये विद्यार्थी गणवेशात नियमित हजेरी लावताना दिसले. तसेच काही शाळा दुपारनंतर संपात सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Mumbai school update)
शिक्षकांनी हा बंदचा निर्णय घेतला असला तरी मुंबईतील काही शिक्षक अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेत आहेत. शिक्षण संचालनालयाकडून कारवाई आणि वेतन कपातीचा इशारा मिळाल्यानंतर अनेक शिक्षकांना संभ्रम वाटत असल्याचे दिसून आले. तरीही राज्यातील बहुतांश भागात शाळा बंद राहिल्याने आज शिक्षण व्यवस्था ठप्प झाली असून, सरकार आणि शिक्षक संघटनांमधील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.






