Investment Rules | आजच्या वेगवान जीवनशैलीत केवळ पैसे कमावणे पुरेसे नसून त्यांचे योग्य नियोजन आणि गुंतवणूक करणे तितकेच महत्त्वाचे झाले आहे. आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी बचत, खर्च आणि गुंतवणूक यामध्ये संतुलन राखणे आवश्यक असते. तज्ज्ञांच्या मते, काही सोपे आर्थिक नियम आत्मसात केल्यास भविष्यातील आर्थिक गरजा सहज पूर्ण करता येतात आणि संपत्ती निर्माण करण्याचा मार्ग अधिक सुलभ होतो.
शेअर बाजारातील चढ-उतार, जागतिक घडामोडी आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर योग्य आर्थिक नियोजन अधिक महत्त्वाचे ठरते. अशा परिस्थितीत काही लोकप्रिय गुंतवणूक सूत्रे व्यक्तीला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवू शकतात आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यास मदत करतात.
पैसा वाढवण्याचे गणित समजून घ्या :
गुंतवणुकीत सर्वाधिक चर्चिला जाणारा नियम म्हणजे Rule of 72. या सूत्राच्या मदतीने गुंतवलेली रक्कम किती वर्षांत दुप्पट होईल याचा अंदाज बांधता येतो. यासाठी 72 ला वार्षिक परताव्याच्या टक्केवारीने भागले जाते. उदाहरणार्थ, एखाद्या गुंतवणुकीवर 12 टक्के परतावा मिळत असल्यास 72 ÷ 12 = 6, म्हणजे अंदाजे सहा वर्षांत गुंतवणूक दुप्पट होऊ शकते.
याचप्रमाणे Rule of 114 आणि Rule of 144 देखील गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त मानले जातात. Rule of 114 च्या सहाय्याने गुंतवणूक तिप्पट होण्यासाठी लागणारा कालावधी समजू शकतो, तर Rule of 144 चारपट वाढीसाठी लागणारा अंदाजे वेळ दर्शवतो. जर वार्षिक परतावा 12 टक्के असेल तर Rule of 114 नुसार सुमारे 9.5 वर्षांत रक्कम तिप्पट होऊ शकते, तर Rule of 144 नुसार जवळपास 12 वर्षांत ती चौपट होण्याची शक्यता असते.
Investment Rules | खर्च, बचत आणि सुरक्षिततेचे सूत्र :
आर्थिक व्यवस्थापनासाठी 50-30-20 Rule अत्यंत लोकप्रिय मानला जातो. या नियमानुसार उत्पन्नातील 50 टक्के रक्कम घरभाडे, अन्नधान्य आणि इतर आवश्यक खर्चांसाठी वापरावी. 30 टक्के हिस्सा प्रवास, मनोरंजन आणि वैयक्तिक आवडींसाठी राखून ठेवावा, तर उर्वरित 20 टक्के रक्कम गुंतवणूक आणि बचतीसाठी वापरण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे आर्थिक शिस्त निर्माण होते आणि भविष्यासाठी निधी तयार होतो.
100 Minus Age Rule हा गुंतवणुकीतील जोखीम आणि सुरक्षितता यामधील समतोल राखण्याचा मार्ग मानला जातो. या सूत्रानुसार 100 मधून स्वतःचे वय वजा केल्यानंतर मिळणारा आकडा इक्विटीमध्ये गुंतवणुकीचा टक्का मानला जातो. उदाहरणार्थ, वय 30 वर्षे असल्यास 70 टक्के रक्कम इक्विटीमध्ये आणि उर्वरित 30 टक्के डेट किंवा सुरक्षित साधनांमध्ये गुंतवता येते. याशिवाय तज्ज्ञ कमाईतील किमान 10 टक्के हिस्सा नियमितपणे गुंतवण्याचा सल्ला देतात. उत्पन्न वाढल्यास गुंतवणुकीचे प्रमाणही वाढवावे.
आर्थिक सुरक्षिततेसाठी Emergency Fund देखील अत्यावश्यक मानला जातो. नोकरी गमावणे, अचानक आजारपण किंवा इतर आकस्मिक संकटांच्या वेळी हा निधी मोठा आधार ठरतो. सामान्यतः किमान सहा महिन्यांच्या खर्चाएवढी रक्कम स्वतंत्र आपत्कालीन निधी म्हणून ठेवण्याची शिफारस केली जाते. या सात आर्थिक नियमांचे पालन केल्यास बचत, गुंतवणूक आणि खर्च यामध्ये योग्य संतुलन राखता येते आणि दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य मिळवणे सोपे होते.






