Navi Mumbai Traffic | नवी मुंबई (Navi Mumbai) शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करून रस्ते व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये अत्याधुनिक इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ITMS) लागू करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तंत्रज्ञानाच्या मदतीने वाहतूक नियंत्रण अधिक स्मार्ट पद्धतीने केले जाणार आहे.
58 चौकांमध्ये बसणार स्मार्ट यंत्रणा :
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत शहरातील 58 प्रमुख चौक आणि वाहतूक मार्गांवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी केंद्रीकृत कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारले जाणार असून संपूर्ण यंत्रणा एकाच ठिकाणाहून नियंत्रित केली जाईल. प्रकल्पाशी संबंधित प्रतिनिधी करण (Karan) आणि कुशल (Kushal) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या वापरात असलेल्या पारंपरिक पद्धतीऐवजी डेटा-आधारित आणि तात्काळ निर्णय घेणारी प्रणाली विकसित केली जात आहे.
या योजनेतील अॅडॉप्टिव्ह ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम (ATCS) हे प्रमुख वैशिष्ट्य ठरणार आहे. सध्याचे सिग्नल निश्चित वेळापत्रकानुसार कार्यरत असतात, मात्र नवीन यंत्रणा चौकातील वाहनांची संख्या आणि वाहतुकीची घनता ओळखून सिग्नलचा कालावधी आपोआप ठरवेल. त्यामुळे वाहनचालकांना रिकाम्या चौकात विनाकारण थांबावे लागणार नाही. परिणामी इंधन बचत होण्यासोबतच वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होईल.
Navi Mumbai Traffic | नियमभंगावर AI ची नजर, ग्रीन कॉरिडॉरलाही मदत :
या प्रकल्पाची अंमलबजावणी पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (PPP) तत्त्वावर केली जात आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका (Navi Mumbai Municipal Corporation) किंवा शासनावर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही. प्रकल्पासाठी लागणारी उपकरणे, त्यांचे संचालन, देखभाल आणि चाचणी यांची जबाबदारी खासगी भागीदार कंपनीकडे असणार आहे.
यंत्रणेमध्ये ऑटोमेटेड नंबर प्लेट रिकग्निशन (ANPR) आणि रेड लाईट व्हायोलेशन डिटेक्शन (RLVD) प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे सिग्नल तोडणे, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे किंवा लेन नियमांचे उल्लंघन करणे अशा प्रकारांची स्वयंचलित नोंद होईल.
याशिवाय रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलासाठी तातडीने ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याची सुविधाही उपलब्ध असणार आहे. शहरातील 58 ठिकाणी व्हेरिएबल मेसेज डिस्प्ले (VMD) बोर्ड आणि पब्लिक अॅड्रेस (PA) प्रणाली बसवून वाहतूक बदल, अपघात, हवामान इशारे किंवा आपत्कालीन सूचना नागरिकांपर्यंत तत्काळ पोहोचवल्या जाणार आहेत. सर्वेक्षण, उपकरण उभारणी, चाचणी आणि पूर्ण क्षमतेने कार्यान्वयन अशा चार टप्प्यांत हा प्रकल्प राबवला जाणार असून भविष्यात ही व्यवस्था देशातील इतर शहरांसाठीही आदर्श ठरू शकते.






