Pune Tourists Missing | उत्तराखंडमधील धारली गावात काल रात्री झालेल्या ढगफुटीने मोठे विध्वंस घडवले. पुराच्या पाण्याने गावात हाहाकार माजवला असून अनेक जण बेपत्ता आणि काही मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे. या नैसर्गिक आपत्तीत महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकले असून, त्यात पुणे, सोलापूर आणि नांदेड जिल्ह्यातील लोकांचा समावेश आहे. विशेषतः पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द गावातील 1990 सालच्या दहावीच्या बॅचमधील 19 जण बेपत्ता असल्याने खळबळ उडाली आहे.
हा समूह 1 ऑगस्ट रोजी उत्तराखंड पर्यटनासाठी रवाना झाला होता. त्यांचा शेवटचा संपर्क गंगोत्री परिसरातून झाला होता. काल सकाळी काही सदस्यांनी फोटो आणि स्टेटस शेअर केले होते. मात्र दुपारी ढगफुटी झाल्यानंतर संपर्क तुटल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांची चिंता वाढली आहे. (Pune Tourists Missing)
शेवटचा फोन: “सर्वजण सुखरूप आहोत”; त्यानंतर शांतता :
समूहातील एका महिलेने तिच्या मुलाला फोन करून “आम्ही सर्वजण सुखरूप आहोत” असे सांगितल्याचे समजते. मात्र त्यानंतर कोणत्याही सदस्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. प्रशासन, पोलिस, आणि आपत्कालीन यंत्रणा तपास करत असून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या 19 जणांच्या स्थितीबाबत अनिश्चितता आहे.
स्थानिक प्रशासन आणि उत्तराखंड पोलिस यांच्याकडून बचावकार्य सुरू असून, घटनास्थळी एनडीआरएफची पथकंही दाखल झाली आहेत. दरम्यान महाराष्ट्र शासनानेही सतर्कता दाखवून तात्काळ परिस्थितीचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. (Pune Tourists Missing)
Pune Tourists Missing | सोलापूर आणि नांदेडच्या पर्यटकांची स्थिती :
उत्तराखंडमध्ये सोलापूर जिल्ह्याचेही चार तरुण अडकले आहेत. त्यांनी शेवटचा संपर्क काल सकाळी 11 वाजता गंगोत्रीहून साधला होता. त्यानंतर चौघांचेही फोन बंद आहेत. विठ्ठल पुजारी, समर्थ दसरे, धनराज बगले आणि मल्हारी धोटे अशी अडकलेल्या तरुणांची नावे आहेत. सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून त्यांच्या शोधासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने, एनडीआरएफने जाहीर केलं आहे की मृतांमध्ये सोलापूरच्या कुठल्याही व्यक्तीचा समावेश नाही.
दरम्यान, नांदेडचे 11 पर्यटक उत्तरकाशीतील खराडी गावात सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्क कार्यालयाने प्रवाशांशी संपर्क साधला असून, सर्वजण सुखरूप असल्याचे सांगण्यात आले आहे.






