Zilla Parishad Election | राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच आता ग्रामीण भागातील सत्तासंघर्षालाही वेग येण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकांचा निकाल लागताच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याचे संकेत मिळत आहेत. राज्य निवडणूक आयोगाकडून या संदर्भातील हालचालींना वेग आला असून लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Panchayat Samiti Election)
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण होताच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोग सज्ज होणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. (Zilla Parishad Election 2026 Date)
फेब्रुवारीत मतदानाची शक्यता :
राज्य निवडणूक आयोगातील मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा ७ जानेवारी रोजी केली जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना अचानक वेग आला असून इच्छुक उमेदवार आणि पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे.
राज्यात एकूण ३२ जिल्हा परिषद आणि ३३६ पंचायत समित्यांसाठी निवडणुका होणार आहेत. मात्र आरक्षणाच्या अडचणींमुळे सर्वच संस्थांमध्ये निवडणूक होणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, १७ जिल्हा परिषद आणि ८८ पंचायत समित्या या ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण मर्यादा ओलांडत असल्याने त्या या निवडणुकीतून वगळल्या जाण्याची शक्यता आहे.
Zilla Parishad Election | आरक्षणाचा पेच आणि न्यायालयाचा दबाव :
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाचा प्रश्न मोठा अडथळा ठरत असल्याचे चित्र आहे. आरक्षणाच्या मर्यादा ओलांडणाऱ्या संस्थांमुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यास आतापर्यंत विलंब झाला. त्यामुळे केवळ आरक्षणाच्या निकषांमध्ये बसणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्येच निवडणुका घेण्याची तयारी निवडणूक आयोग करत आहे. (Zilla Parishad Election 2026)
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचा दबाव निवडणूक आयोगावर असून, आरक्षणाचा पेच काही अंशी सुटल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लवकरच जाहीर होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.






