Baramati Election | राज्यातील बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ही निवडणूक जाहीर झाली असून ती बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्यामुळे या राजकीय समीकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी या घडामोडींवर स्पष्ट भूमिका मांडत लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याचे सांगितले.
बिनविरोध निवडणुकीच्या चर्चेत बदल :
बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी चर्चा सुरू होती. मात्र लक्ष्मण हाके यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आपण निवडणूक लढवण्याचा विचार करत असल्याचे जाहीर केले. तसेच पवार कुटुंबीयांवर टीका करत त्यांनी बिनविरोध निवडणुकीला विरोध दर्शवला.
दरम्यान, या मुद्द्यावर बोलताना युगेंद्र पवार यांनी सांगितले की, बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी भूमिका सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मांडली आहे. सुनेत्रा काकींसाठी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच बारामतीचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Baramati Election | गॅस टंचाई आणि राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया :
या चर्चेदरम्यान युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांनी राज्यातील गॅस टंचाईच्या प्रश्नावरही भाष्य केले. राज्यातील अनेक नागरिकांनी गॅससाठी नाव नोंदवूनही 40 दिवसांहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. बारामतीमध्ये दिवंगत अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांनी विकासकामांमध्ये कधीही कमतरता भासू दिली नाही, अशी आठवण त्यांनी करून दिली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत विचारले असता युगेंद्र पवार यांनी यावर भाष्य करण्यास टाळले. या विषयाची सध्या कोणतीही ठोस माहिती नसल्याचे सांगत त्यांनी या चर्चांवर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. त्यामुळे बारामती पोटनिवडणुकीत पुढे कोणते राजकीय समीकरण तयार होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






