मराठवाड्याच्या राजकारणात महिलांचे वर्चस्व! छत्रपती संभाजीनगरसह ‘या’ शहरांची सूत्रे महिलांकडे असणार

On: January 22, 2026 2:36 PM
Marathwada Mayor
---Advertisement---

Marathwada Mayor | मराठवाड्यातील पाच महानगरपालिकांसाठी महापौर पदाची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड-वाघाळा, परभणी आणि लातूर या महापालिकांमध्ये यंदा महिलांना नेतृत्वाची संधी मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी सर्वसाधारण तर काही ठिकाणी अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी महापौर पद राखीव करण्यात आलं आहे. (Marathwada Mayor Election)

या आरक्षणामुळे मराठवाड्यातील स्थानिक राजकारणात महिलांचा प्रभाव वाढणार असल्याचं चित्र आहे. आधीच नगरसेवक पदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर महिला उमेदवार निवडून आल्या असून, आता महापौर पदावरही महिला नेतृत्व येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक शहरात महापौर कोण होणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड-वाघाळा महापालिकेत काय स्थिती असणार? :

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत महापौर पद (Chhatrapati Sambhajinagar Mayor) हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झालं आहे. त्यामुळे या शहरात महिला महापौर निश्चित आहे. सध्या भाजपकडे संख्याबळ असल्याने पक्षातील महिला नगरसेविकांपैकी कोणाला ही संधी मिळते याकडे लक्ष लागलं आहे. यापूर्वीही येथे शिवसेना-भाजप युतीत महिलांना महापौर पदाची संधी मिळाली होती. आरक्षण जाहीर झाल्यानंतर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून महापौर निवडीचा निर्णय घेतला जाईल, असं भाजप नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे.

नांदेड-वाघाळा महानगरपालिकेतही खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी महापौर पद राखीव झालं आहे. येथेही भाजप मजबूत स्थितीत असल्यामुळे महिला नगरसेविकांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. दोन्ही शहरांमध्ये महिलांना नेतृत्वाची संधी मिळणार असल्याने मराठवाड्यात महिलांचा राजकीय प्रभाव अधिक वाढणार आहे.

Marathwada Mayor | जालना, परभणी आणि लातूर :

जालनामध्ये पहिल्यांदाच महानगरपालिका निवडणूक (Jalna Municipal Corporation) झाली असून, येथे महापौर पद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आलं आहे. भाजपने येथे मोठं यश मिळवलं असून, डॉ. रीमा काळे, वंदा मगरे आणि श्रद्धा साळवे या महिला नगरसेविकांची नावं महापौर पदासाठी चर्चेत आहेत. जालन्याच्या पहिल्या महापौर म्हणून कोण महिला विराजमान होते, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

परभणी महानगरपालिकेत महापौर पद (Parbhani Municipal Corporation) हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झालं आहे. त्यामुळे येथे महिला किंवा पुरुष महापौर होण्याचा निर्णय बहुमत असलेला पक्ष घेणार आहे. सध्या येथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा वरचष्मा असल्यामुळे पक्ष नेतृत्वाकडून महिला उमेदवाराला संधी दिली जाते का, यावर मराठवाड्यातील महिलाराजाचा विक्रम अवलंबून आहे. (Parbhani Mahapalika)

लातूर महानगरपालिकेत (Latur Municipal Corporation) महापौर पद हे अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव झालं आहे. येथे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांमध्ये चर्चा सुरू असून, महिला महापौर कोण होणार याचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे. जर परभणीमध्येही महिलेला संधी मिळाली, तर मराठवाड्यातील पाचही महानगरपालिकांवर महिला महापौर असतील, असा ऐतिहासिक योग तयार होणार आहे.

News Title: Women Leadership in Marathwada: Who Will Become the Next Mayor in Chhatrapati Sambhajinagar?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now