Vilas Ghule Case | बीड (Beed) जिल्ह्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात काही नव्या घडामोडी समोर आल्याने चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, तपासादरम्यान नोंदविण्यात आलेल्या जबाबांमध्ये खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) आणि त्यांचे पुत्र सौरभ सोनवणे (Saurabh Sonawane) यांचा उल्लेख झाल्याने या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, घुले कुटुंबीयांनी मुख्य सूत्रधारावर कठोर कारवाईची मागणी करत तीव्र आंदोलन छेडले होते.
मुख्य सूत्रधारावर कारवाईच्या मागणीने आंदोलन :
विलास घुले यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. मुख्य सूत्रधाराविरोधात गुन्हा दाखल होत नसल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी तब्बल 11 तास केज (Kej) पोलीस ठाण्याबाहेर मृतदेह ठेवून आंदोलन केले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रात्री उशिरा घुले कुटुंबीयांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या विलास घुले यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला झाल्याचा आरोप असून त्यातून त्यांचा मृत्यू झाला.
Vilas Ghule Case | पुरवणी जबाबामुळे नवे वादंग :
या प्रकरणातील तपासादरम्यान नोंदविण्यात आलेल्या पुरवणी जबाबात सौरभ सोनवणे यांचा उल्लेख करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच दुसऱ्या एका फिर्यादीत खासदार बजरंग सोनवणे यांचे नावही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय स्वरूप प्राप्त झाले असून बीड जिल्ह्यातील वातावरण अधिकच ढवळून निघाले आहे.
दरम्यान, उमेश माने (Umesh Mane) यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात हत्येचा प्रयत्न आणि ॲट्रॉसिटी (Atrocity Act) कायद्यांतर्गत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासानुसार, आरोपींच्या नातेवाईकातील एका महिलेशी संबंधित वादातून हा संघर्ष सुरू झाला होता. या वादात विलास घुले मध्यस्थी करण्यासाठी पुढे आल्याने त्यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप आहे. फिर्यादीत आरोपींनी खासदार आमचे नातेवाईक आहेत, त्यामुळे आमच्यावर काही कारवाई होणार नाही, असे धमकीवजा वक्तव्य केल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. या सर्व घडामोडींमुळे तपासाची दिशा आणि राजकीय परिणाम याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






