सिया आणि चेतनने पळून जाऊन लग्न का केलं नाही? चेतनने पोलिसांना दिल खरं उत्तर

On: June 25, 2026 12:35 PM
Ketan Agarwal Case
---Advertisement---

Chetan Choudhary | पुणे (Pune) येथील तरुण उद्योजक केतन अग्रवाल (Ketan Agarwal) मृत्यू प्रकरणातील तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. सुरुवातीला लोहगड किल्ला (Lohagad Fort) परिसरात ट्रेकिंगदरम्यान झालेला अपघात म्हणून समोर आलेली घटना प्रत्यक्षात नियोजनपूर्वक घडवून आणलेला खून असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील आरोपी सिया गोयल (Siya Goyal) आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी (Chetan Choudhary) यांना न्यायालयाने 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून चौकशीदरम्यान अनेक महत्त्वाचे खुलासे होत आहेत.

प्रतिष्ठेच्या भीतीने टाळला दुसरा मार्ग :

तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, सियाला केतनसोबत विवाह करायचा नव्हता आणि तिचे चेतनवर प्रेम होते. मात्र, तरीही दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न करण्याचा पर्याय स्वीकारला नाही. यामागे सियाच्या मनात असलेली कुटुंबाच्या प्रतिष्ठेबाबतची भीती कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.

अवघ्या 20 वर्षांच्या सियाला साखरपुडा मोडल्यास किंवा प्रियकरासोबत घर सोडल्यास कुटुंबाची समाजात बदनामी होईल, अशी चिंता सतावत होती. कुटुंबातील सदस्यांना लोकांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल आणि सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसेल, या विचारामुळे तिने पळून जाण्याचा पर्याय नाकारल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे परिस्थितीतून मार्ग काढण्याऐवजी तिने आणि चेतनने वेगळाच मार्ग स्वीकारल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

चेतन चौधरीने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, दोघांमध्ये अनेक वेळा एकत्र पळून जाण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र, सिया यासाठी कधीच तयार नव्हती. लग्न मोडल्याने आई-वडिलांची प्रतिमा खराब होईल, असे तिला वाटत होते. याच मानसिक दबावातून दोघांनी मिळून केतनला कायमचा मार्गातून दूर करण्याचा निर्णय घेतल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

Chetan Choudhary | सीसीटीव्हीमुळे उलगडला संपूर्ण प्रकार :

18 जून रोजी केतनचा पाय घसरून तो दरीत कोसळल्याचा दावा सुरुवातीला करण्यात आला होता. मात्र, तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. त्यावेळी एक तरुण हुडी घालून आणि कानात हेडफोन लावून केतन व सियाच्या मागोमाग जात असल्याचे दृश्य समोर आले.

एका फुटेजमध्ये सिया मागे वळून पाहताच तो संशयित व्यक्ती तातडीने खाली बसल्याचेही आढळले. या हालचालींनी पोलिसांचा संशय अधिक गडद झाला. विशेष म्हणजे, घटनेच्या दिवशी परिसरात सुमारे 33 अंश सेल्सिअस तापमान होते. इतक्या उष्ण वातावरणात हुडी घालून फिरणारी व्यक्ती पोलिसांच्या नजरेत भरली. पुढील तपासात ही व्यक्ती चेतन चौधरी असल्याचे स्पष्ट झाले. तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी दोघांनी मिळून खुनाचा कट रचल्याचा दावा न्यायालयात केला आहे. या प्रकरणात आणखी काही महत्त्वाचे तपशील समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

News Title: Why didn’t Siya and Chetan elope and get married? Chetan gave the true answer to the police

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now