Mumbai Mayor 2026 | मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदाची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. यंदा मुंबईचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले असून, त्यामुळे पुढची महिला महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेचे नेतृत्व कोणाकडे जाणार, याबाबत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
यंदाच्या पालिका निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि रिपाई अशी तीन पक्षांची महायुती होती. या महायुतीकडे स्पष्ट बहुमत असून एकूण 118 नगरसेवक आहेत, तर बहुमताचा आकडा 114 आहे. त्यामुळे मुंबईचे महापौरपद महायुतीकडे जाणे निश्चित मानले जात आहे. महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्याने आता भाजपकडून दावा मजबूत होत असल्याचे चित्र आहे.
भाजपकडून कोणती नावे चर्चेत? :
मुंबईत भाजपकडे अनेक सक्षम महिला नगरसेविका असून त्यांच्यापैकी काहींची नावे महापौरपदासाठी चर्चेत आली आहेत. राजश्री शिरवडकर, अलका केरकर, हर्षिता नार्वेकर, रितू तावडे, आशा मराठे आणि शितल गंभीर ही नावे चर्चेत आहेत. ( BJP mayor candidate)
तसेच मालाडमधून मोठ्या मताधिक्क्याने निवडून आलेल्या योगिता सुनील कोळी यांचे नावही महापौरपदासाठी पुढे येत आहे. दहीसर येथील वॉर्ड क्रमांक 2 मधून तेजस्वी घोसाळकर या दुसऱ्यांदा नगरसेविका झाल्या असून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली आहे.
Mumbai Mayor 2026 | भाजपकडे महिला नेतृत्वाचे अनेक पर्याय :
मुंबई महापालिकेत यंदा एकूण 130 महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत. यापैकी भाजपकडे 89 नगरसेवकांपैकी 49 महिला नगरसेविका आहेत, तर शिवसेना ठाकरे गटाकडे 65 पैकी 38 महिला नगरसेविका आहेत. त्यामुळे महापौरपदासाठी भाजपकडे पर्यायांची कमतरता नसल्याचे स्पष्ट होते. (Mumbai Mayor 2026)
मुंबईच्या महापौरपदी महिला विराजमान होणार हे निश्चित मानले जात असून, कोणत्या चेहऱ्यावर भाजप अंतिम शिक्का मारतो, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






