Devendra Fadnavis | मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली. “मुंबई कुणी लुटली?” आणि “मराठी माणूस मुंबईबाहेर का गेला?” असे थेट सवाल उपस्थित करत त्यांनी गेल्या काही दशकांतील मुंबईतील राजकारण, भ्रष्टाचार आणि मराठी माणसाच्या विस्थापनावर बोट ठेवलं. (Thackeray Brothers Criticism)
२५ वर्षे मुंबईवर सत्ता असतानाही मराठी माणसाला हक्काचं घर का मिळालं नाही, गिरणी कामगारांना न्याय का मिळाला नाही, असा सवाल करत फडणवीसांनी (Devendra Fadnavis) ठाकरे बंधूंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. पत्राचाळ, बीडीडी चाळ, अभ्युदय नगर आणि विशाल सह्याद्रीतील रहिवाशांच्या प्रश्नांवर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
‘राजकीय अस्तित्व पणाला लागल्यानेच हा आक्रोश’ :
ही लढाई कोणत्याही समाजाच्या अस्तित्वाची नसून काही नेत्यांच्या राजकीय अस्तित्वाची असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. “औरंगजेब ज्यांना संपवू शकला नाही, त्यांना कोणीही संपवू शकणार नाही. तसा कोणाचा प्रयत्नही नाही,” असं ठणकावत त्यांनी ठाकरे बंधूंवर अप्रत्यक्ष टोला लगावला.
आपलं राजकीय अस्तित्व धोक्यात आल्याची जाणीव झाल्यामुळेच काही लोकांकडून समाजात भीती पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप फडणवीसांनी केला. “त्यांच्या पायाखालची जमीन सरकत असल्याचं त्यांना कळून चुकलं आहे,” असं म्हणत त्यांनी या संपूर्ण वादामागचं कारण मांडलं.
Devendra Fadnavis | रस्ते, कचरा आणि कोव्हिडमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार :
मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावर बोलताना देवेंद्र फडणवीसांनी धक्कादायक उदाहरणे दिली. २०० रस्त्यांच्या ऑडिटमध्ये रस्त्यांच्या खाली असायला हवं असलेलं PQC (Pavement Quality Concrete) प्रत्यक्षात आढळलंच नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला. कागदावर रस्ते पूर्ण दाखवले गेले, मात्र प्रत्यक्षात त्यांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. (Mumbai Corruption)
कचरा उचलण्यासाठी आणि मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी ट्रकऐवजी दुचाकी आणि रिक्षांचे नंबर वापरून कोट्यवधी रुपयांची बिले काढली गेल्याचा आरोपही फडणवीसांनी केला. कोव्हिड काळात डॉक्टर आणि नर्स नसतानाही कंत्राटदारांच्या फायद्यासाठी सेंटर्स उभारण्यात आले, बॉडी बॅग्समध्येही घोटाळे झाले, यामुळे अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला, असा दावा त्यांनी केला.
मुंबई कशी लुटली गेली, याचे पुरावे राज ठाकरे यांनीच पूर्वी जनतेसमोर मांडले होते, असा उल्लेख करत फडणवीसांनी ठाकरे बंधूंच्या राजकारणावर थेट हल्लाबोल केला.






