Prashant Tamang Death | मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दु:खद आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. इंडियन आयडॉल 3 चे विजेते आणि लोकप्रिय गायक-अभिनेता प्रशांत तमांग यांचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या 46 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला असून, त्यांच्या अकस्मात निधनाने चाहते आणि संपूर्ण मनोरंजन क्षेत्र हादरून गेले आहे. (Prashant Tamang Death)
11 जानेवारी 2026 रोजी दिल्लीतील त्यांच्या राहत्या घरात प्रशांत तमांग मृतावस्थेत आढळून आले. ही माहिती समोर येताच एकच खळबळ उडाली असून, त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने संगीत आणि अभिनय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
दिल्लीतील निवासस्थानी मृत्यू, कारण अद्याप अस्पष्ट :
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत तमांग यांना प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्यानंतर 11 जानेवारी रोजी दिल्लीतील द्वारका येथील एका रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. काही रिपोर्ट्सनुसार त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच त्यांच्या मृत्यूचं अधिकृत कारण अद्याप समोर आलेलं नाही. चित्रपट निर्माते राजेश घटानी आणि प्रशांत तमांग यांचे मित्र अमित पॉल यांनी त्यांच्या निधनाबाबत दु:खद माहिती दिली आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
Prashant Tamang Death | पोलीस अधिकारी ते सुपरस्टारपर्यंतचा प्रवास :
प्रशांत तमांग हे मूळचे दार्जिलिंग परिसरातील रहिवासी होते. ते कोलकाता पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. वडिलांचे लहानपणीच अपघाती निधन झाल्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली होती. अवघ्या 18 व्या वर्षी त्यांनी पोलीस दलात नोकरी स्वीकारली.
नोकरी करत असतानाच त्यांनी इंडियन आयडॉल 3 मध्ये सहभाग घेतला आणि संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेत शो जिंकला. त्यानंतर त्यांनी अनेक नेपाळी चित्रपटांमध्ये काम केलं. अलीकडेच ते ‘पाताल लोक 2’ या वेब सिरीजमध्ये खलनायकाच्या भूमिकेत झळकले होते, ज्याचं प्रेक्षकांनी विशेष कौतुक केलं होतं. (Prashant Tamang Death)
चाहत्यांना अश्रू अनावर :
दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्यांनी अरुणाचल प्रदेशात लाईव्ह परफॉर्मन्स दिला होता. तसेच 30 डिसेंबर रोजी दुबईमध्येही त्यांनी कार्यक्रम सादर केला होता. कोणतीही गंभीर आरोग्य समस्या नसतानाही त्यांचं अचानक निधन झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
प्रशांत तमांग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार दिल्लीमध्ये करावेत की त्यांच्या मूळ गावी दार्जिलिंगला नेण्यात यावेत, याबाबत कुटुंबीयांमध्ये चर्चा सुरू आहे. त्यांच्या निधनाने लाखो चाहत्यांना अश्रू अनावर झाले आहेत.






