विधानभवनात गुंडगिरी, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले नेमका कोण आहे? जाणून घ्या पार्श्वभूमी

On: July 18, 2025 11:51 AM
Hrishikesh Takale Profile
---Advertisement---

Hrishikesh Takale Profile | महाराष्ट्राच्या विधीमंडळ परिसरात घडलेल्या तुफान राड्यानंतर राजकीय वातावरण तापलेले असतानाच सर्वांचं लक्ष एका नावाकडे वळलं आहे – ऋषिकेश ऊर्फ सर्जेराव टकले. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा कट्टर समर्थक असलेल्या या कार्यकर्त्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra aawhad) यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना विधानभवनाच्या दारात मारहाण केली. यामुळे टकलेचं नाव चर्चेत आलं आहे. पण नेमका हा टकले आहे तरी कोण?

१७ जुलै रोजी विधानभवनाच्या पायऱ्यांवर झालेल्या हाणामारीत टकलेने आव्हाड समर्थक देशमुख यांना मारहाण केली. त्यानंतर रात्री झालेल्या आंदोलनातही हा विषय पुन्हा पेटला. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांना वेगळं केलं आणि टकले व देशमुख यांचे जबाब नोंदवण्यात आले. पण या घटनेच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाडांनी थेट आरोप केला की, “टकले हा मकोकाचा आरोपी आहे.”

गोपीचंद पडळकर यांच्यासोबत सावलीसारखा फिरणारा :

ऋषिकेश टकले हा गेल्या चार वर्षांपासून गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांच्यासोबत सतत दिसतो. मतदारसंघातील दौरे, सभा, अधिवेशने असोत किंवा कार्यक्रम – टकले हमखास त्यांच्या सोबत असतो. सांगली जिल्ह्यातील माळवाडी, तालुका पलूस येथील हा कार्यकर्ता ‘हिंदुस्थान शिव मल्हार क्रांती सेना’ या संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे.

राजकीय वर्तुळात त्याचे वावर अगदी स्वच्छ असल्याचं चित्र नाही. उलट, त्याच्यावर महिलेचा विनयभंग, मारहाणी, शासकीय कामात अडथळा, प्राणघातक हल्ला, अपहरण, अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली नोंदवले गेले आहेत.

Hrishikesh Takale Profile | टकलेवर कोणते गुन्हे दाखल आहेत? :

टकलेवर खालील IPC कलमान्वये गुन्हे दाखल आहेत:

324, 323, 504, 506, 143, 147, 148, 354(b), 114, 332, 353, 352, 365, 307 या कलमांमुळे टकलेच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होतात. एवढ्या गंभीर गुन्ह्यांचा आरोपी असलेला व्यक्ती राजकीय कार्यक्रमांमध्ये, तेही विधानभवनात, इतक्या सहजपणे फिरत असेल, तर सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहणे साहजिक आहे.

मकोकाचा आरोपी? आव्हाडांचा गंभीर आरोप :

जितेंद्र आव्हाड यांनी थेट विधानसभेत सांगितलं की, “पडळकरांचा कार्यकर्ता मकोकाचा आरोपी आहे. त्याचा हेतूच आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करण्याचा होता.” मकोका (MCOCA) हा गंभीर गुन्हेगारी पद्धतीच्या टोळीविरोधातील कायदा आहे. त्यामुळे या आरोपात जर तथ्य असेल, तर टकलेविरोधात कारवाई टाळणे सरकारसाठीही धोकादायक ठरू शकते. (Hrishikesh Takale Profile)

घटनेनंतर पडळकरांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी सरकारकडून टकलेविषयी कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. पोलिसांनी त्याचे जबाब घेतले आहेत पण अद्याप गुन्हा दाखल झाल्याचे संकेत नाहीत. विधानभवनासारख्या उच्च दर्जाच्या संस्थेत जर गुन्हेगार मोकळे वावरत असतील, तर लोकशाहीची शिस्त आणि सुरक्षा यंत्रणांची कार्यक्षमता यावर प्रश्न उपस्थित होतात.

News Title: Who is Hrishikesh Takale? BJP MLA Padalkar’s Aide Accused of Assault in Vidhan Bhavan, Criminal Past Exposed

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now