Clay Pot | उन्हाळ्याच्या झळांपासून दिलासा देण्यासाठी मातीचे माठ हे आजही सर्वाधिक पसंतीस उतरतात. बाजारात काळा आणि लाल अशा दोन प्रकारचे माठ मिळतात, पण त्यापैकी कोणता आरोग्यास अधिक फायदेशीर आणि पाणी अधिक थंड ठेवणारा आहे, याबाबत तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Clay Pot )
काळ्या माठाचं पाणी अधिक थंड आणि शुद्ध
काळ्या रंगाचे माठ हाताने बनवले जातात आणि ते लाल माठांच्या तुलनेत जास्त पाणी थंड ठेवतात. हे माठ नर्मदा नदीच्या शुद्ध मातीपासून व पिवळ्या मातीच्या मिश्रणातून बनवले जातात. हाताच्या चाकावर तयार केल्यानंतर ते चुलीत भाजले जातात, त्यामुळे त्यामध्ये लहान-लहान छिद्रांची निर्मिती होते. ही छिद्रं बाष्पीभवन क्रियेमुळे पाण्याचे तापमान घटवतात आणि त्यामुळे पाणी नैसर्गिकरित्या थंड राहतं.
या माठात भरलेलं पाणी हळूहळू थंड होतं आणि त्याचवेळी पाणी कोणत्याही हानिकारक घटकांपासून मुक्त राहतं. त्यामुळे उन्हाळ्यात शरीरासाठी योग्य, सुरक्षित आणि आरोग्यदायी असा पाण्याचा पर्याय काळा माठ असतो.
लाल माठ – सौंदर्य अधिक, कार्यक्षमता कमी
लाल रंगाचे माठ मशीनद्वारे बनवले जातात. त्यामुळे ते आकर्षक, एकसंध आणि विविध डिझाइनमध्ये असतात, ज्यामुळे ग्राहक त्याकडे अधिक आकर्षित होतात. मात्र थंडीकरणाच्या बाबतीत हे माठ काळ्या माठांच्या तुलनेत मागे पडतात. यामध्ये आतून खास प्रकारचा लेप लावला जातो ज्यामुळे काही प्रमाणात पाणी थंड राहतं, पण नैसर्गिक थंडीकरणाचा दर्जा मिळत नाही. (Clay Pot )
माठातील पाण्याचे आरोग्यदायी फायदे – आयुर्वेद सांगतो काय?
माठातील पाणी शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. हे पाणी नैसर्गिकरित्या थंड राहतं आणि त्याचं pH स्तर संतुलित असतो. त्यामुळे पचन, रक्तदाब, त्वचेसंबंधी त्रास, हृदयविकार यांसारख्या समस्या टाळण्यास मदत होते. शिवाय, या पाण्याची चवही नैसर्गिक आणि आनंददायक असते. मातीतील सूक्ष्म खनिजे पाण्यात मिसळल्यामुळे आरोग्याला अतिरिक्त पोषण मिळतं.






