Come Early Go Early scheme | आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महाराष्ट्र विधान परिषदेत महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘कम अर्ली-गो अर्ली’ म्हणजेच ‘लवकर या-लवकर जा’ ही विशेष योजना लागू करण्याची माहिती दिली. या निर्णयामुळे महिलांना प्रवासातील अडचणी आणि काम-घर यातील समतोल राखणे सोपे होईल, असा सरकारचा विश्वास आहे.
मुंबईसारख्या मोठ्या शहरात कार्यालयीन वेळेत मोठी गर्दी असते. विशेषतः पीक अवर्समध्ये महिलांना प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर महिलांना अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर वातावरण देण्यासाठी ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
‘लवकर या-लवकर जा’ योजना नेमकी कशी काम करणार? :
या योजनेनुसार मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचारी सकाळी ९.१५ ते ९.४५ या वेळेत कार्यालयात येऊ शकतात. त्या जर नेहमीपेक्षा काही मिनिटे आधी काम सुरू करत असतील, तर त्यांना संध्याकाळी तितक्याच मिनिटांनी लवकर कार्यालयातून निघण्याची परवानगी मिळणार आहे.
या पद्धतीमुळे महिलांना सुमारे ३० मिनिटांपर्यंत सवलत मिळू शकते. यामुळे गर्दीच्या वेळेत होणारा प्रवासाचा त्रास कमी होईल तसेच घर आणि कार्यालय यांच्यातील जबाबदाऱ्या सांभाळणे महिलांसाठी अधिक सोपे होईल.
Come Early Go Early scheme | महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारचे विविध उपक्रम :
विधान परिषदेत झालेल्या चर्चेदरम्यान महिलांच्या सुरक्षेबाबतही महत्त्वाची माहिती देण्यात आली. हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी राज्यात Operation Muskan ही मोहीम राबवली जाते. जुलै २०१५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत या मोहिमेच्या १४ टप्प्यांद्वारे तब्बल ४२,५९४ बालकांचा शोध लावण्यात आला आहे.
तसेच Operation Shodh या मोहिमेद्वारे ५,०६६ महिला आणि २,७७१ बालकांना शोधण्यात यश आले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘मिसिंग सेल’ कार्यरत असून महिलांच्या तक्रारी सोडवण्यासाठी ५१ ‘भरोसा सेल’ सुरू करण्यात आले आहेत.






