Weather Update | पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात गेल्या 24 तासांत मोठे बदल दिसून येत आहेत. ‘डिटवाह’ चक्रीवादळ पूर्णपणे कमजोर झाल्यानंतर राज्यात आकाश निरभ्र होत असले, तरी उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव कायम आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये गारठा टिकून आहे. मात्र हवामान विभागाने गुरुवार, 4 डिसेंबरसाठी नवा अलर्ट जारी करत तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता वर्तवली आहे. (Maharashtra Weather Update)
कोल्ड वेव्हचा प्रभाव काही प्रमाणात ओसरत असला तरी, सकाळच्या वेळेत दाट धुके आणि दवबिंदूंची नोंद अनेक ठिकाणी होत आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये तापमानातील फरक वाढला असून दिवसा हलकी उष्णता आणि रात्री गारठा जाणवत आहे.
पुणे, सातारा आणि कोल्हापूरमध्ये तापमानात चढ-उतार :
पुण्यात आज थंडीची लाट ओसरताना दिसत आहे. कमाल तापमान 28.3°C तर किमान तापमान 11.5°C राहण्याचा अंदाज आहे. घाटमाथा भागात सकाळ-संध्याकाळ गारठा जाणवत राहणार असून, दाट धुक्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. शहरातील दिवसा तापमान वाढू लागले असले तरी रात्री पुन्हा गारठा वाढतो आहे. (Pune Weather Update )
सातार्यात बुधवारी कमाल तापमान 30.7°C आणि किमान 13.4°C इतके नोंदले गेले. आज या जिल्ह्यात तापमान 15°C ते 31°C दरम्यान राहील. पर्वतीय भागात गारठा अधिक तीव्र राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
कोल्हापूरमध्ये कमाल तापमानात वाढ नोंदली गेली असून आज ते 29–30°C पर्यंत जाण्याची शक्यता आहे. किमान तापमान 20°C च्या आसपास राहील. त्यामुळे गारठा कमी जाणवेल, असे संकेत विभागाने दिले आहेत. (Kolhapur Weather Update)
Weather Update | सोलापूर आणि सांगलीमध्ये धुकं व हलका गारठा कायम :
सोलापूरमध्ये बुधवारी कमाल तापमान 31.3°C आणि किमान 17.6°C नोंदवले गेले. आज तापमानात हलक्या स्वरूपात वाढ होऊन पारा दिवसा 32°C आणि रात्री 16°C पर्यंत खाली येईल. जिल्ह्यात सकाळी धुक्याचा प्रभाव कायम राहणार आहे. (Solapur Weather Update)
सांगली जिल्ह्यात किमान तापमान 16.3°C नोंदले गेले असून आज कमाल तापमान 31°C आणि किमान 18°C राहील. येथील वातावरणात थोडी स्थिरता दिसत असली तरी सकाळच्या वेळेत हलका गारठा आणि धुक्याची स्थिती कायम आहे. (Sangli Weather Update)
राज्यातील थंडीची लाट कमी होत असली तरी तापमानात चढ-उतार सुरूच राहतील, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. काही जिल्ह्यांत सकाळच्या वेळी धुके–दव तर दिवसभर सौम्य थंडीची जाणीव राहील. पुढील 48 तासांत हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता असून, नागरिकांनी हवामान विभागाच्या अलर्टकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.






