Oliver Tree | मनोरंजन क्षेत्राला गेल्या काही आठवड्यांत सलग धक्के बसत आहेत. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर (Suman Kalyanpur) यांच्या निधनानंतर आता आणखी एका गायकाच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. ३३ वर्षीय गायक ऑलिव्हर ट्री (Oliver Tree) याचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, या घटनेमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
रिओ डी जनेरियोतील दुर्घटनेने खळबळ :
मिळालेल्या माहितीनुसार, ब्राझीलमधील रिओ डी जनेरियो (Rio de Janeiro) येथे दोन हेलिकॉप्टरची हवेत टक्कर झाल्याने भीषण दुर्घटना घडली. या अपघातानंतर त्यापैकी एक हेलिकॉप्टर इलेक्ट्रिक कार शोरूमच्या पार्किंग परिसरात कोसळल्याने आग लागल्याचे सांगितले जात आहे.
या दुर्घटनेत दोन्ही हेलिकॉप्टरमधील एकूण सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये गायक ऑलिव्हर ट्री याचाही समावेश असल्याचा दावा वृत्तांमध्ये करण्यात आला आहे. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाकडून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे.
Oliver Tree | अनोख्या शैलीमुळे मिळाली जागतिक ओळख :
१९९३ मध्ये कॅलिफोर्निया (California) येथे जन्मलेल्या ऑलिव्हर ट्रीने लहान वयातच संगीत क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण बाऊल-कट हेअरस्टाइल आणि वेगळ्या सादरीकरणामुळे त्याने अल्पावधीतच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
‘लाइफ गोज ऑन’ (Life Goes On), ‘मिस यू’ (Miss You), ‘एलियन बॉय’ (Alien Boy) आणि ‘व्हेन आय एम डाउन’ (When I’m Down) यांसारख्या गाण्यांमुळे त्याला मोठी लोकप्रियता मिळाली. २०२० मध्ये त्याचा पहिला स्टुडिओ अल्बम ‘अगली इज ब्युटीफुल’ (Ugly Is Beautiful) प्रदर्शित झाला होता. यावर्षी एप्रिल महिन्यात त्याने ‘लव्ह यू मॅडली, हेट यू बॅडली’ (Love You Madly, Hate You Badly) हा अल्बम रसिकांच्या भेटीला आणला होता.
मृत्यूच्या वृत्तापूर्वी ऑलिव्हर ट्री युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि आशियातील विविध देशांच्या दौऱ्यावर असल्याची माहिती समोर आली होती. त्याच्या आकस्मिक निधनाच्या वृत्तामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला असून, सोशल मीडियावर अनेकांकडून शोक व्यक्त केला जात आहे.






