Weight Loss Tips| आजकाल अनेकजण वजन कमी करण्यासाठी डाएटिंग, कमी खाणे आणि तळलेले पदार्थ टाळणे अशा विविध उपायांचा अवलंब करतात. तरीही काही लोकांना अपेक्षित परिणाम दिसत नाहीत. कमी खाल्ल्यानंतरही वजन कमी होत नसल्याची तक्रार अनेकजण करतात. कमी खाऊनची वजन कमी होत नाही यामागे नेमकं काय कारण आहे? याविषयी जाणून घेऊया.
तज्ज्ञांच्या मते, वजन कमी होणे हे फक्त कमी खाण्यावर अवलंबून नसते. शरीरातील चयापचय, झोप, ताणतणाव आणि जीवनशैली यांचाही त्यावर मोठा परिणाम होत असतो. वजन कमी न होण्यामागे काही सामान्य पण महत्त्वाची कारणे असू शकतात. त्यातील पहिले कारण म्हणजे मंद चयापचय (मेटाबॉलिझम). जर शरीरातील चयापचय प्रक्रिया मंद असेल तर शरीर कॅलरीज हळूहळू जाळते. दीर्घकाळ अत्यंत कमी खाण्यामुळेही चयापचय मंदावू शकतो. त्यामुळे फक्त उपाशी राहण्याऐवजी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.
दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे पुरेशी झोप न मिळणे. झोपेचा थेट संबंध वजनाशी असतो. कमी झोप झाल्यास शरीरात भूक वाढवणारे हार्मोन्स सक्रिय होतात. त्यामुळे जास्त खाण्याची इच्छा होते आणि वजन कमी होण्याऐवजी वाढण्याची शक्यता असते.
तिसरे कारण म्हणजे जास्त ताणतणाव. धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकजण तणावाखाली असतात. ताण वाढल्यास शरीरात कॉर्टिसोल नावाचा हार्मोन वाढतो. हा हार्मोन विशेषतः पोटाभोवती चरबी जमा होण्यास कारणीभूत ठरतो.
चौथे कारण म्हणजे शारीरिक हालचालींचा अभाव. फक्त डाएट करून वजन कमी होत नाही. शरीर सक्रिय असणेही तितकेच आवश्यक आहे. दिवसभर बसून काम केल्यास कॅलरीज कमी प्रमाणात जळतात. त्यामुळे दररोज किमान 30 मिनिटे चालणे किंवा व्यायाम करणे फायदेशीर ठरते.
पाचवे कारण म्हणजे लपलेल्या आरोग्य समस्या. काही हार्मोनल समस्या किंवा इतर आरोग्याशी संबंधित अडचणीमुळेही वजन कमी होण्यात अडथळे येऊ शकतात. त्यामुळे सातत्याने प्रयत्न करूनही वजन कमी होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि ताणतणाव नियंत्रणात ठेवणे हे चार घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. योग्य जीवनशैली अंगीकारल्यास वजन नियंत्रणात ठेवणे सोपे होऊ शकते.






