Weather Update | महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे आगमन झाले आहे. २८ ऑक्टोबरपर्यंत राज्यात गडगडाटासह मध्यम ते हलका पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. उत्तर विदर्भ वगळता राज्यातील बहुतांश भागात सरी बरसणार आहेत. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात अचानक बदल झाला असून, मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली गेली आहे.
बदलत्या हवामानाचा प्रभाव
अवकाळी पावसामुळे कोकण (weather update) आणि मध्य महाराष्ट्रात वातावरण ढगाळ झाले आहे. शुक्रवारी संध्याकाळी मुंबई आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांना अक्षरशः चकित केले. फोर्ट, वरळी, भायखळा, कांदिवली, बोरीवली, पवई आणि अंधेरी परिसरात पावसाने तासभर धुमाकूळ घातला. दिवसा तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने घामाघूम वातावरण आणि रात्री अचानक पडणारा पाऊस, या विरोधाभासामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात परिवर्तित झाले असून, हवेतील ओलावा वाढला आहे. यामुळे पुढील काही दिवस मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कायम राहतील, असे हवामान तज्ञ अश्रेय शेट्टी यांनी सांगितले. विशेषतः कोकणात शनिवारी आणि रविवारी मुसळधार पावसाची शक्यता असून, पुढील आठवड्यातही मुंबई आणि परिसर ढगाळ राहणार आहे.
Weather Update | कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?
हवामान खात्याने राज्यातील (weather upadte) अनेक भागांना यलो अलर्ट जारी केला आहे. २५ ऑक्टोबर रोजी नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, अकोला, बुलढाणा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. तर, २६ ऑक्टोबरला मुंबई, खान्देश, कोल्हापूर आणि नांदेड या भागात पावसाची शक्यता वर्तविली आहे. आणि २७ ऑक्टोबरलाही धुळे, नाशिक, सातारा आणि पुण्यासह कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि खान्देश भागात पावसाचा इशारा आहे. तर २८ ऑक्टोबर रोजी पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, रायगड, रत्नागिरी आणि नांदेड या जिल्ह्यांत गडगडाटासह सरींचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. सध्या खरीप हंगामातील पिके कापणीस सज्ज आहेत आणि अशा वेळी झालेल्या पावसामुळे नुकसान होऊ शकते. राज्यातील अनेक ठिकाणी सोयाबीन, तूर आणि कापूस या पिकांचे मोठे प्रमाणात उत्पादन झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
दरम्यान, पावसामुळे शहरांमध्ये वाहतूक कोंडी, वीजपुरवठा खंडित होणे आणि जलसंचयन वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आणि गरज असल्याशिवाय बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. पुढील पाच दिवस हवामानातील हा बदल कायम राहणार असल्याने राज्यात अवकाळी सरींची मालिका सुरूच राहण्याची शक्यता आहे.








