Weight Loss | वजन कमी करण्यासाठी अनेकजण व्यायामाची सुरुवात चालणे किंवा धावणे यापैकी एखाद्या पद्धतीने करतात. हे दोन्ही प्रकार सर्वात सोपे आणि लोकप्रिय व्यायाम मानले जातात. मात्र वजन कमी करण्यासाठी नेमके कोणते अधिक प्रभावी आहे, हा प्रश्न अनेकांना पडतो. काहींना वाटते की धावल्याने जास्त मेहनत होते आणि त्यामुळे वजन लवकर कमी होते, तर काहीजण चालणे हा अधिक सुरक्षित पर्याय मानतात. (Walking vs Running weight loss)
खरं तर चालणे आणि धावणे या दोन्ही प्रकारांचे वेगवेगळे फायदे आहेत. व्यक्तीचे वय, फिटनेस लेव्हल, आरोग्य आणि रोजच्या जीवनशैलीवर अवलंबून कोणता पर्याय अधिक योग्य ठरेल हे ठरते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी दोन्ही पद्धती कशा प्रकारे उपयोगी ठरतात हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते.
धावल्याने जास्त कॅलरी बर्न होतात :
फिटनेस तज्ज्ञांच्या मते, धावण्यामुळे कमी वेळेत अधिक कॅलरी खर्च होतात. काही अभ्यासांनुसार, समान अंतर पार केल्यास धावणाऱ्या व्यक्तींच्या शरीरातील चरबी आणि वजन चालणाऱ्या व्यक्तींपेक्षा अधिक वेगाने कमी होताना दिसते. (Walking vs Running weight loss)
अहवालांनुसार सुमारे 70 किलो वजन असलेली व्यक्ती 30 मिनिटे धावल्यास जवळपास 300 कॅलरी बर्न करू शकते. त्यामुळे कमी वेळेत जास्त परिणाम हवा असेल तर धावणे हा प्रभावी पर्याय मानला जातो. नियमित धावण्यामुळे मेटाबॉलिझमही वेगाने काम करू लागते.
Weight Loss | चालणेही वजन कमी करण्यासाठी फायदेशीर :
तथापि चालणे हा कमी परिणामकारक पर्याय आहे असे नाही. नियमित आणि वेगाने चालल्यास म्हणजेच ‘ब्रिस्क वॉकिंग’ केल्यास वजन कमी करण्यात मोठी मदत होऊ शकते. विशेषतः व्यायामाची सुरुवात करणाऱ्या व्यक्ती, जास्त वजन असलेले लोक किंवा गुडघेदुखीचा त्रास असणाऱ्यांसाठी चालणे अधिक सुरक्षित मानले जाते.
त्याच 30 मिनिटांच्या कालावधीत वेगाने चालल्यास साधारण 140 ते 160 कॅलरी बर्न होऊ शकतात. जरी धावण्याच्या तुलनेत कॅलरी कमी बर्न होत असल्या तरी चालणे दीर्घकाळ सातत्याने करता येते, त्यामुळे त्याचा एकूण परिणाम चांगला दिसू शकतो.
दोन्हींपैकी कोणता पर्याय निवडावा?
वजन कमी करण्यासाठी धावणे की चालणे यापैकी एकच पर्याय सर्वोत्तम आहे असे ठामपणे सांगणे कठीण आहे. कमी वेळात जास्त कॅलरी खर्च करायच्या असतील तर धावणे अधिक प्रभावी ठरू शकते. परंतु हळूहळू आणि सुरक्षित पद्धतीने वजन कमी करायचे असल्यास चालणे हा उत्तम पर्याय ठरतो.
दररोज 45 ते 60 मिनिटे वेगाने चालल्यास धावण्याइतकीच कॅलरी बर्न होऊ शकते. त्यामुळे व्यायामातील सातत्य आणि नियमितता सर्वात महत्त्वाची मानली जाते. आपल्या शरीराला योग्य वाटेल असा पर्याय निवडून नियमित व्यायाम केल्यास वजन कमी करण्यात नक्कीच मदत मिळू शकते.






